कोईम्बतूरमधील स्टार्टअप कंपनीने दिला 14 कोटींचा बोनस, 140 कर्मचार्‍यांचे नशीब फळफळले

तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका स्टार्टअप कंपनीने अन्य कुणा स्टार्टअप कंपनीने केले नसेल ते करून दाखवलंय. कोवाई.को असे या स्टार्टअपचे नाव आहे. हे स्टार्टअप बिझनेस-टू-बिझनेस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरवते. सरवणकुमार यांनी 2011 मध्ये ही कंपनी सुरू केली होती. स्थापनेच्या चौदा वर्षांनंतर सरवणकुमार यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना दिलेले वचन पूर्ण करत त्यांच्या 140 कर्मचार्‍यांना 14 कोटी रुपये बोनस दिला.

स्टार्टअपचे संस्थापक सरवणकुमार हे मुळचे कोईम्बतूरचे आहेत या शहराला कोवाई असेही म्हटले जातो. कोईम्बतूर या शहराच्या नावावरूनच त्यांनी स्टार्टअप कंपनीचे नाव ठेवले. सरवणकुमार यांची कंपनी बीबीसी, शेल यासारख्या अनेक दिग्गज कंपन्यांना आपली सेवा देते.

सरवणकुमार 10 वर्षे आयटी कर्मचारी होते. त्यांना मार्केटमध्ये एक संधी दिसली आणि त्यांनी स्टार्टअप सुरू करायचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीने बाहेरून कोणतेही फंडींग घेतलेले नाही. कोवाई.को स्टार्टअप सध्या वर्षाला 15 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवत आहे आणि सध्या याचे बाजारमूल्य 100 दशलक्ष डॉलर इतके आहे. सरवणकुमार यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना दिलेले वचन पूर्ण केले आणि 140 कर्मचार्‍यांना 14 कोटींचा बोनस दिला.