कोकेन तस्करीप्रकरणी तिघांना अटक 

कोकेन तस्करीप्रकरणी तिघांना खार पोलिसांनी अटक केली. संतोषकुमार  यादव, अनानी पंफर्ट आणि कॉसमॉस न्योण्ये अशी या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

खार परिसरात काही जण कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक वैभव काटकर आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी खार येथील विष्णू बुवा कदम मैदानजवळ साध्या वेशात सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून यादवला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी कोकेन जप्त केले. पोलिसांनी यादवची कसून चौकशी केली.

चौकशी केल्यानंतर पोलिसांनी नालासोपारा आणि वसई येथून अनानी पंफर्ट आणि कॉसमॉस न्योण्येला ताब्यात घेऊन अटक केली. अनानीच्या घरातून पोलिसांनी कोकेन आणि गांजा जप्त केला आहे. त्या तिघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.