मुंबईला वेगवान करणारा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत डेरेदाखल होणार आहे. यामुळे वांद्रे ते मरीन ड्राइव्ह अशा 15 किलोमीटरच्या प्रवासाला लागणारा 50 मिनिटांचा कालावधी अवघ्या बारा मिनिटांवर येणार आहे.
मुंबईत दररोज शेकडो वाहनांची भर पडत असल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक, मुंबईकरांना करावा लागत आहे. शिवाय वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून कोस्टल रोड बांधण्याचा पर्याय समोर आला. यानुसार पालिकेच्या माध्यमातून 14 हजार कोटी खर्च करून कोस्टल रोडचे नियोजन करण्यात आले. यानुसार ऑक्टोबर 2018 पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. यानुसार नोव्हेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र प्रकल्पाविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका निकाली निघण्यात गेलेला वेळ, स्थानिक मच्छीमारांनी पिलरमधील 60 मीटरचे अंतर 120 मीटरपर्यंत करण्याची केलेली मागणी आणि कोरोना काळ यामुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण झाले. मात्र आता कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले असून वांद्रे सी लिंकला हा मार्ग जोडण्यात आला आहे.
70 टक्के तर इंधन, 34 टक्के वेळेची बचत
या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक जोडण्यात आला आहे. यामुळे वांद्रे ते मरीन ड्राइव्ह अशा प्रवासासाठी लागणारा 50 मिनिटांचा कालावधी बारा मिनिटांवर येणार असून इंधनाची 70 टक्के बचत तर वेळेची 34 टक्के बचत होणार आहे.
असा आहे कोस्टल रोडचा फायदा
- कोस्टल रोडला समांतर अशी 7.5 किमी लांबीची फुटपाथ बांधण्यात येणार आहे. प्रियदर्शिनी पार्प ते वरळी सी फेसपर्यंत हा पदपथ असेल. यावर सायकल ट्रकही असेल.
- मार्गावर वेगमर्यादा ताशी 80 ते 100 किमी. या ठिकाणी एक ‘फुलपाखरू उद्यान, मैदाने, मुलांसाठी घसरगुंडी, सी सॉ फळी, झोके असतील.
- भूमिगत पार्पिंगमध्ये अमर सन्स येथे – 256, महालक्ष्मी मंदिर व हाजी अली – 1,200 तर वरळी सी फेस येथे – 400 वाहन क्षमता.
- बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार
आहेत. - कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलीस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असणार आहेत.