गुजरातच्या पोरबंदरमध्ये आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हिंदुस्थानी तटरक्षक दलाचे एएलएच म्हणजेच अॅडव्हान्स लाईट ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन पायलटसह तिघांचा मृत्यू झाला. कोसळल्यानंतर क्षणार्धातच हेलिकॉप्टरने पेट घेतला. पोरबंदर हवाई पट्टीवर उतरताना हा अपघात झाला. दरम्यान, गेल्या वर्षी ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या तीन घटना घडल्या. त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कमला बाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश कनमिया यांनी दिली. सुधीर कुमार यादव, मनोज कुमार आणि सौरभ कुमार अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
गेल्या वर्षी 2 सप्टेंबरलाही कोसळले होते हेलिकॉप्टर
गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजीही अशाच प्रकारे अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ कोसळून तटरक्षक दलाचे तीन कर्मचारी बेपत्ता झाले होते, तर चारपैकी केवळ एकालाच वाचवण्यात यश आले होते. पोरबंदरच्या अरबी समुद्रात हे हेलिकॉप्टर कोसळले होते.
2023 मध्ये तीन अपघात
- 8 मार्च – हिंदुस्थनी नौदलाच्या ‘एएलएच ध्रुव’चे अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. 8 मार्च 2023 रोजी सकाळी ही घटना घडली. हे हेलिकॉप्टर घेऊन नौदलाचे जवान गस्तीसाठी निघाले होते.
- 26 मार्च – ‘एएलएच धुव्र’ हेलिकॉप्टरचे केरळमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या अपघातात प्रशिक्षणार्थी पायलटचा हात फ्रॅक्चर झाला. ‘एएलएच ध्रुव मार्क 3’ हेलिकॉप्टरची चाचणी सुरू होती. लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टर 25 फूट उंचीवर उडत होते.
- 4 मे – ‘एएचएल हेलिकॉप्टर ध्रुव’ 4 मे 2023 रोजी किश्तवाड, जम्मू आणि कश्मीर येथे कोसळले. या अपघातात कारागीर पब्बला अनिल यांचा मृत्यू झाला होता तर दोन पायलट गंभीर जखमी झाले होते. लष्कराच्या म्हणण्यानुसार सकाळी सवाअकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने हवाई वाहतूक नियंत्रकाला तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना दिली होती.