ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी 4 ते 6 रुपयांनी महागणार

वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे. असे असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर आता सीएनजीच्या दरात 4 ते 6 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारने शहरी किरकोळ पुरवठादारांना स्वस्त सीएनजीचा पुरवठा कमी केला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. काही महिन्यांत दिल्लीतही विधानसभा निवडणूक जाहीर होईल. अशा परिस्थितीत वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकार सीएनजीवरील उत्पादन शुल्कात कपात करू शकते. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये सीएनजीवर आधारित वाहनांची संख्या मोठी आहे. भाववाढीमुळे मतदारांचा रोष सरकारला परवडणारा नाही. अशा स्थितीत परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार उत्पादन शुल्क कमी करू शकते, अशीही चर्चा आहे.