महागाईचं ‘मिटर डाऊन’! मुंबईत CNG च्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ; रिक्षा भाडं वाढवण्याची मागणी

महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 1 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 24 नोव्हेंबर रोजी सीएनजीचे दर किलोमागे 2 रुपये वाढवण्यात आले होते.

गुरुवारी पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रतिकिलोमागे 1 रुपये वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत प्रतिकिलो सीएनजीसाठी 77 ऐवजी 78 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, बस यांसारखी सार्वजनिक परिवहन वाहने सीएनजीवर विसंबून असतात. त्यामुळे या वाहनांना सीएनजीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून त्याचा भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागणार आहे.

मुंबई शहरासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात 10 लाखांहून अधिक वाहने सीएनजी इंधनावर चालतात. आता सीएनजीचे दर वाढल्याने सार्वजनिक परिवहन वाहनांपैकी रिक्षाचालकांच्या युनियनने भाडेदरात 3 रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास किमान रिक्षा भाडे 23 रुपयांवर 26 रुपयांवर जाईल. रिक्षापाठोपाठ टॅक्सी व इतर वाहनांच्या भाडेदरातही वाढ होऊ शकते. त्यामुळे याची झळ मुंबईकरांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे.

दरवाढीबाबत महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमजीएल अतिरिक्त बाजारमुल्य असलेले नैसर्गिक गॅस आयात करत आहे. गॅस घेण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने प्रतिकिलोमागे 1 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.