मतदान प्रक्रिया पार पडताच नागरिकांना मोठा झटका, CNG च्या किंमती ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडताच नागरिकांना मोठा झटका बसला आहे. महानगर गॅस कंपनीने CNG च्या दरांमध्ये वाढ करत निवडणुकीच्या रंगात नाहून निघालेल्या जनतेला एकप्रकारचा धप्पा दिला आहे. सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली असून नवीन दर आजपासून (22 नोव्हेंबर) लागू केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

नैसर्गिक वायूच्या खरेदीत आणि इतर ऑपरेटिंग खर्चांमध्ये वाढ झाल्यामुळे MGL ने गॅसचे दर वाढवले आहेत. MGL ने याआधाची जुलै 2024 मध्ये CNG ची किंमत किलोमागे 1.50 रुपायांनी वाढवली होती. त्यामुळे सीएनजीची किंमत 75 रुपये किलो इतकी होती. मात्र आजपासून CNG च्या किंमतीमध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे CNG आता 77 रुपयांना मिळणार आहे.

सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीएनजी पर्यावरणपूरक असल्यामुळे अनेक वाहन चालकांनी आपल्या वाहनांमध्ये सीएनजी बसवून घेतला आहे. सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सीएनजी वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात रिक्षा, टी परमिट गाड्या, बेस्ट बसेस, एसटी बसेस या सीएनजीवर धावतात. त्यामुळे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सर्वांनाच सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने आर्थिक फटका बसणार आहे.