सीएनजी गॅसच्या दराचा भडका, प्रतिकिलो 1 रुपया 10 पैशांची वाढ; सहा महिन्यांत साडेपाच रुपयांची सीएनजी महागला

पर्यावरणपूरक आणि तुलनेने स्वस्त असणाऱ्या सीएनजी गॅसदरात प्रतिकिलो 1 रुपया 10 पैशांची वाढ करण्यात आली आहे. शनिवार, 28 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले असून, नव्या दरानुसार शहरात आता सीएनजी 89 रुपये किलोने मिळणार आहे. एक महिन्यापूर्वीच सीएनजी दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा 1 रुपया 10 पैसे वाढविण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणत फटका सहन करावा लागत असल्याने अनेक नागरिक आता ‘कॉप्रेस्ड नॅचरल गॅस’ म्हणजेच ‘सीएनजी’ वाहनांकडे वळले आहेत. पर्यावरणपूरक आणि स्वस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक सीएनजी वाहनांची खरेदी करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’कडून (एमएनजीएल) शहरातील सीएनजी दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. सध्या शहर परिसरात सीएनजी 87.90 रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. यात आता 1 रुपया 10 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून एक किलो सीएनजी गॅससाठी 89 रुपये मोजावे लागणार आहेत.

जुलैपासून म्हणजेच मागील सहा महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो सुमारे साडेपाच रुपयांची वाढ झाली आहे. 9 जुलै रोजी किलोमागे दीड रुपयाची वाढ करण्यात आली. त्यावेळी सीएनजी 85 रुपये प्रतिकिलो उपलब्ध होत होता. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी त्यात आणखी 90 पैशांची वाढ करण्यात आल्याने तो 85.90 एवढा झाला. त्यात गेल्या महिन्यात थेट दोन रुपयांची वाढ झाल्याने सीएनजीची किंमत 87.90 रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. आता यात आणखी 1 रुपया 10 पैशांनी वाढ झाल्याने सीएनजी प्रतिकिलो 89 रुपयांना विकत घ्यावा लागणार आहे.

सीएनजी वाहनधारकांना आर्थिक फटका

शहरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे तीन ते चार लाखांवर आहे. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर रिक्षा, पीएमपीएल बसेससह अन्य वाहनांचा समावेश आहे. सध्या पीएमपीएलच्या ताफ्यात जवळपास 800 बसेस या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. यामुळे अशा वाहनचालकांना याचा फटका बसणार असून वाढीव दराने गॅस खरेदी करावा लागणार आहे.