दिल्लीत भाजप नेत्याची इफ्तार पार्टी; मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

पार्टी विथ डिफरन्स आणि हिंदुत्ववादी भूमिका असणारा पक्ष असे म्हणवणाऱ्या पक्षाच्या म्हणजेच भाजप नेत्याने दिल्लीत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री रेखी गुप्ता, प्रवेश वर्मा यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. दिल्ली हज समितीच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या कौसर जहाँ यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशीत्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

कौसर जहाँ म्हणाल्या, आज मी दावत-ए-इफ्तारचे आयोजन केले आहे. होळीच्या एक दिवसानंतर इफ्तार होत आहे आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यात सहभागी होत आहेत. मोठ्या संख्येने इतर लोकही येत आहेत. रमजान महिना हा आशीर्वाद आणि प्रार्थनांचा महिना आहे. सर्वशक्तिमान आपल्या प्रार्थना स्वीकारो आणि त्याचे आशीर्वाद वर्षाव करो. ईद 15 दिवसांनी येत आहे, म्हणून मी आतापासून सर्वांना ईद मुबारक करू इच्छिते. सर्वांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा, असे त्या म्हणाल्या. देश सामाजिक सौहार्दाने पुढे जात आहे आणि प्रगती करत आहे हे पाहून बरे वाटते. या देशात प्रत्येकासाठी एक स्थान आहे, प्रत्येकाच्या हृदयात एक स्थान आहे. भारत एक खूप मोठी लोकशाही आहे, जिथे आपल्याला शांती, सौहार्द आणि प्रेमाने पुढे जायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

कौसर जहाँ यांच्या इफ्तार पार्टीला भाजप नेते शाहनवाज हुसेन, मुस्तफाबादचे आमदार मोहन सिंग बिश्त, खासदार कमलजीत सेहरावत आणि जफर इस्लाम आदी उपस्थित होते. सर्वांनी खजूर खाऊन उपवास सोडला आणि इफ्तार केला. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि मंत्री प्रवेश वर्मा यांनीही इफ्तार कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याशिवाय किरण रिजिजू आणि विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता हे देखील कौसर जहाँ यांच्या इफ्तार पार्टीला पोहोचले. या इफ्तार पार्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.