शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासणारा निवडणूक आयोग ठाण्यात साफ झोपी गेला आहे. रविवारी कोपरी-पाचपाखाडीत निवडणूक अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर रात्री १० नंतर रॅली सुरू असतानाही कोणतीही कारवाई न करणाऱ्या निवडणूक यंत्रणेने बुधवारी रात्रीही कळवा, मुंब्यात झोपेचे सोंग घेतले. कळव्यात रात्री दहा वाजून गेल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होते. मात्र निवडणूक आयोगाने सपशेल कानाडोळा केला. निवडणूक यंत्रणा फक्त मिंध्यांसाठी काम करतात काय, अशा संतप्त प्रतिक्रिया ठाणेकरांमधून उमटल्या आहेत.
कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड विरुद्ध महायुतीचे नजीब मुल्ला अशी लढत आहे. दरम्यान बुधवारी रात्री कळव्यातील शिवाजी चौक, कळवा नाका परिसरात नजीब मुल्ला यांच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उशिरा हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी 9 वाजून 50 मिनिटांनी भाषणाला सुरुवात केली. या सभेत त्यांनी लाडकी बहीण आणि क्लस्टर या त्याच त्याच मुद्यांचा राग आळवला. 10 वाजून 10 मिनिटे झाली तरी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरूच होते. मात्र आचारसंहितेचे तीनतेरा वाजवत सुरू असलेल्या सभेदरम्यान निवडणूक आयोग अधिकारी आणि पोलीसदेखील उपस्थित होते. मात्र दुसऱ्यांदा आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोग काही अॅक्शन घेणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लाडक्या बहिणींनो पैसे मिळाले का? भरसभेत महिलांचा नाही नाहीचा नारा
सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. या भाषणात त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले की नाही, असा प्रश्न विचारत हात वर करण्यास सांगितले. यावेळी काही उपस्थित महिलांनी जोर जोरात ‘आमचे पैसे नाही आले, आमचे पैसे नाही आले’ असा आवाज दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करत तुमच्या खात्यातही पैसे येणार, असे आश्वासन यावेळी दिले.