एकनाथांचा ‘व्हॅलेंटाईन’ संपला! भाजपकडून कोंडी, देवाभाऊंचे धक्क्यावर धक्के

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा व्हॅलेंटाईन आता संपला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी शिंदे आणि त्यांच्या मिंधे गटाला धक्क्यावर धक्के देत बेजार करून सोडले आहे. पालकमंत्रीपदावरून मिंधे गटाने वाद घातल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयालाच फडणवीसांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना एकापाठोपाठ एक बंद करण्याचे सत्र सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरूनही शिंदे यांची उचलबांगडी करण्यात आली. दुसरीकडे अजित पवार गटाशी फडणवीस यांची जवळीक वाढल्याने मिंधे गटातही चलबिचल सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार   तिजोरीवर ताण पडल्याचे कारण देत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळय़ा मार्गांचा अवलंब  करत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेलाही कात्री लावली जाणार आहे. आनंदाचा शिधा ही शिंदे यांनी विशेषत्वाने सुरू केलेली योजना आहे, परंतु तीसुद्धा बंद करा असे फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीवरून एकनाथ शिंदे यांना हटवल्यामुळे केवळ शिंदेच नाहीत तर मिंधे गटातील आमदारही नाराज आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही या समितीमध्ये आहेत, परंतु फक्त शिंदे यांनाच बाजूला करण्यात आल्याबद्दल मिंधे गटात संताप आहे.

महायुतीमध्ये तीन-तीन पक्ष असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना खूश ठेवणे कठीण झाले आहे. फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना आवरू शकतात, पण मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये पदे देण्यात भाजपसारखी शिस्त नाही. आता पदे कमी आणि मागणारे जास्त झाल्याने संपूर्ण महायुतीलाच हा फॉर्म्युला लागू करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यांना महसूल व आपत्ती व्यवस्थापन समितीवरून हटवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 

नाराज शिंदे महत्त्वाच्या बैठका रद्द करून ठाण्यात रुसले

एकनाथ शिंदे फडणवीसांच्या निर्णयांमुळे नाराज आहेत. आज मुंबई आणि ठाणे जिल्ह्याची वार्षिक बैठक होती. पालकमंत्री या नात्याने शिंदे यांनी त्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु त्यांनी बैठकच रद्द केली. त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. ते नॉट रिचेबल झाल्याचे सांगण्यात आले, पण ते ठाण्यामध्येच रुसून बसले असल्याचीही माहिती आहे.

दोन योजना बंद अनेक योजनांना कात्री

मिंधे सरकारच्या काळात सुरू केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘तीर्थदर्शन’ योजना बंद करताना अनेक योजनांना कात्री लावण्याचा सपाटाच फडणवीसांनी सुरू केला.

आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीवरून एकनाथ शिंदे यांना  हटवण्यात आले असून अजित पवार यांना मात्र समितीत मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ठिणगी पडली आहे.