आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकारी मंत्र्यांना आदिवासी बांधवांनी तयार केलेले एक ‘गिफ्ट हॅम्पर’ भेट दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे गिफ्ट नेमके काय आहे, याची उत्सुकता लागली. मंत्री उईके यांनी त्यामध्ये मोहाची दारू असल्याचे सांगताच त्याच्या घमघमाटाने फडणवीसांना घाम फुटला. फडणवीस ताडकन उठले आणि गिफ्टचा ‘मोह’ आवरत त्यांनी दारूच्या बाटल्या मागच्या दाराने बाहेर काढायला लावल्या. त्यांनी हे काय करताय, असे दरडावत उईके यांची कानउघाडणीही केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकी दिवशी मंत्रालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह अभ्यागतांचीही मोठी गर्दी असते. माध्यमांचे प्रतिनिधीही हजर असतात. ही बाब लक्षात घेऊन फडणवीस सावध झाले. पत्रकार परिषदेसाठी बाहेर जमलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची नजर चुकवून त्यांनी मागच्या दाराने दारूच्या बाटल्या गुपचूप मंत्रालयाबाहेर पाठवल्या.