
सध्या मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या (पीए) नियुक्त्यांचा विषय चर्चेत आहे. महायुतीमधील मंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱयांच्या नावांची यादी पीए पदासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली, पण फिक्सर असल्याच्या संशयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 खासगी सचिवांच्या नावांना मान्यता दिलेली नाही. भाजपच्या 5, मिंधे गटाच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या 4 अशा 9 मंत्र्यांना मुख्यमंत्री कार्यालयाने पीए दिलेले नाहीत. त्यामुळे महायुतीच्या 11 मंत्र्यांच्या नाकारलेल्या पीएच्या नावांच्या भोवती आता संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
मंत्रालयातील कारभार स्वच्छ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले उचलली आहेत. त्याची सुरुवात मंत्री कार्यालयापासून केली आहे. मंत्र्यांनी पाठवलेल्या नावांच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अतुल वझे स्वतः नजर टाकतात. त्यांनी मंजुरी दिल्यावरच मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती होते. त्यामुळे मंत्र्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही खदखद बाहेर काढली. आमच्या हातात काहीच राहिलेले नाही. मंत्र्यांचे पीए-पीएस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतात, अशा शब्दांत मनातली अस्वस्थता कोकाटेंनी बाहेर काढली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माणिकराव कोकाटे यांना उत्तर दिले. मंत्र्यांचे पीए-पीएस आणि ओएसडी नियुक्त करण्याचा अधिकारी मुख्यमंत्र्यांचाच आहे, असे स्पष्टपणे सांगून टाकले. यावरच न थांबता आतापर्यंत 125 खासगी सचिवांच्या नावाची यादी आहे. त्यातील 109 जणांच्या नावाला मान्यता दिली. 16 जण फिक्सर आहेत म्हणून मान्यता दिली नाही. फिक्सर लोक मंत्रालयात नको, असे स्पष्टपणे सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर कोणत्या मंत्र्यांना अद्याप पीए नाही याची मंत्रालयात चर्चा सुरू झाली. त्यातून महायुतीच्या 10 मंत्र्यांची नावे पुढे आली. त्यात अजित पवार गटाचे 3, मिंधे गटाचे 3 आणि भाजपचे 4 मंत्री आहेत. त्यामुळे या मंत्र्यांनी पाठवलेल्या नावाच्या खासगी सचिवांच्या नावांभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
या मंत्र्यांना अजूनही पीए नाही
राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
अतुल सावे (भाजप)
चंद्रकांत पाटील (भाजप)
माधुरी मिसाळ (भाजप)
शंभुराज देसाई (शिंदे गट)
संजय शिरसाट (शिंदे गट)
हसन मुश्रीफ (अजित पवार गट)
दत्तात्रय भरणे (अजित पवार गट)
इंद्रनील नाईक (अजित पवार गट)
माणिकराव कोकाटे (अजित पवार गट)
कलंकित पीएस बदलला
राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्या कार्यालयात एक अधिकारी पीएस म्हणून रुजू झाले होते, पण ते पीएस कलंकित असल्यामुळे घेता येणार नाहीत असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जयस्वाल यांना कळवण्यात आले. पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असलेले एक अधिकारी जयस्वाल यांच्याकडे पीए म्हणून रुजू झाले आहेत.