
निसर्गानेही एप्रिल फूल करीत आज आपला इंगा दाखवला. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा असताना दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कोकणात अवकाळीने शेतकऱ्यांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान, हवामान विभागाने पुढचे तीन दिवस मुंबईत तुरळक, तर राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे परिसरात पाऱयाने चाळिशी ओलांडल्याने अंगाची अक्षरशः लाही लाही होत होती. पण आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले. कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. उरणमध्ये तर पावसाने दहा ते पंधरा मिनिटे हजेरी लावली. या अवकाळीमुळे आंबा पिकांवर फुलकिडी व फळमाशीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असून काजूवरदेखील ढेकण्या रोगाचा हल्ला होण्याची शक्यता शेतकऱयांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सरकारने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे केवळ भाजीपाला व आंबे, काजूनाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील वीटभट्टय़ांचेही अतोनात नुकसान झाले आहे. कच्च्या विटा भिजल्या असून वीटभट्टीचालकांना आर्थिक फटका बसला आहे.
पालघर जिल्ह्यात रिमझिम
पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पालघर जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाल्याने नारळी, पोफळीच्या बागा तसेच भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. विशेषतः आंबा बागायतदारांना अवकाळीने चांगलाच फटका दिला असून त्यांचेही नुकसान होणार आहे. मोखाडा तालुक्यात हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
ठाणे जिल्ह्यातही मळभ
अवकाळीमुळे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे शहर अशा विविध भागांमध्ये दिवसभर मळभ होते. काही काळ का होईना नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला.
कोकणात सर्वत्र ढगाळ वातावरण काही भागात पावसाच्या हलक्या सरी
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उष्मा जास्त जाणवत आहे. तर हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे. सायंकाळी 7ः30च्या दरम्यान संगमेश्वर, राजापूर आणि चिपळूण तालुक्याच्या विविध भागात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाटापाठोपाठ हलका पाऊस बरसला. तसेच वैभववाडी तालुक्यात जोरदार अवकाळीच्या सरी कोसळल्या. या अवकाळीचा फटका काजू व आंबा बागायतींना बसणार आहे.
रायगडात सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस
– अलिबाग, मुरुड, पेण, सुधागड, खालापूर, उरण या तालुक्यांमध्ये सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस बरसल्याने त्याचा मोठा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा व काजूच्या पिकांना बसला आहे. काकडी, मिरची, भेंडी, टोमॅटो, पालक, मुळा, मेथी या भाज्याही धोक्यात आल्या असून शेतकऱयांचे पंबरडे मोडणार आहे.
कोल्हापुरात मुसळधार
कोल्हापुरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला. पन्हाळा तालुक्यात गारांचा वर्षाव झाला तर कराडमध्ये काही भागांत वादळी वाऱयासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. वाई, पाचगणी, महाबळेश्वरात जोरदार पाऊस झाला असून, वीजपुरवठा खंडीत झाला. रात्रभर ढगांचा कडकडाट आणि विजा चमकत होत्या. मराठवाडा आणि विदर्भावरही अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे.
शुक्रवारपर्यंत अलर्ट
राज्यातील अनेक भागांत पुढचे तीन दिवस वादळी वाऱयासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही जिह्यांत गारपिटीचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत.