जम्मू-कश्मीरवर अस्मानी संकट; रामबनमध्ये ढगफुटीमुळे 3 जणांचा मृत्यू, मोठ्या नुकसानीची शक्यता

जम्मू कश्मीरवर आता अस्मानी संकट कोसळले आहे. जम्मू-काश्मीरमधील रामबन येथील धर्मकुंडमध्ये रविवारी सकाळी अचानक पूर आला. ढगफुटीमुळे ही पूरपरिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अचानक आलेल्या या पुरात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता झाला आहे आणि अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच, अनेक लोक त्यांच्या घरात अडकले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाणी वाढले आणि अचानक पूर आल्याचे सांगण्यात येत आहे. हे पाणी चिनाब पुलाजवळील धर्मकुंड गावात शिरले. गावात पाणी शिरल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण होते. गावात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे 100 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर 25 ते 30 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. परिसरात पाणी शिरल्याने अनेक लोक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाने आतापर्यंत परिसरातून 90 ते 100 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

दरम्यान, खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्याच्या उपायुक्तांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. उपायुक्त एक्स यांनी पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, रामबन जिल्ह्यात खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षा सल्ल्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
लोकांनी घाबरू नये, एकत्रितपणे आपण या नैसर्गिक आपत्तीवर मात करू.