मुंबईच्या नालेसफाईला मार्चपासून सुरुवात; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पाणी साचू नये यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील छोटय़ा आणि मोठय़ा नाल्यांच्या सफाईची कामे मार्चपासून सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीअखेरपर्यंत ती पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, मुंबईतील नालेसफाईसाठी मुंबई महापालिका सुमारे 395 कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेचे 100 टक्के नालेसफाईचे दावे खोटे ठरल्यामुळे नालेसफाईवरून दरवर्षी पालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदा वेळेत पावसापूर्वीची नालेसफाई पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेचे आहे. यासाठी निविदा प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहेत.