
बदलापुरातील एका शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ताजे असताना कर्जतमध्येही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या धावत्या स्कूल बसमध्ये क्लीनरने अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केला आहे. याबाबत अल्पवयीन विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. करण पाटील असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खालापूर तालुक्यातील लोधिवली सेंट जोसेफ या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी कमलेश ठाकरे यांची माऊली ट्रान्सपोर्ट ही बस सेवा आहे. या बसमध्ये ज्युनियर, सिनियर आणि नर्सरीमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रवास करतात. या बसवर क्लीनर म्हणून वदप कर्जत येथील राहणारा करण पाटील हा तरुण काम करतो. दरम्यान गेले वर्षभर आरोपी मुलींसोबत अश्लील वर्तन करत होता. पीडित मुलीच्या कुटुंबाने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
वर्षभर या तरुणांकडून बसमधील प्रवास करणाऱया मुलींची लैंगिक छळवणूक होत असल्याचे सांगण्यात आले आहे. एक घटना आज उघडकीस आली असून अनेक पालक याबाबत तक्रार देण्यास पुढे येथील म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले.