‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका मदतनिधी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुन्हा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर करून भाजप नेता किरीट सोमय्या व नील सोमय्या या पिता-पुत्राला क्लीन चिट दिली आहे. ऑगस्टमध्ये तत्कालीन दंडाधिकाऱ्यांनी ‘क्लोजर रिपोर्ट’ फेटाळला होता आणि सखोल तपासाचे आदेश दिले होते. तो आदेश देणाऱ्या दंडाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर पोलिसांनी नव्याने ‘क्लोजर रिपोर्ट’ पुढे रेटला आहे. हे प्रकरण ‘ना खरे, ना खोटे’ स्वरूपाचे आहे. घोटाळ्याचा आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत, असे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.
हिंदुस्थानी नौदलाची भंगारात काढलेली युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी गोळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून एप्रिल 2022 मध्ये सोमय्या पिता-पुत्राविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ऑगस्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो रिपोर्ट फेटाळत घोटाळ्याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तीन महिने उलटण्याआधीच पोलिसांनी नव्याने क्लोजर रिपोर्ट दाखल करून सोमय्या पिता-पुत्राला क्लीन चिट दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
2013 मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी मदतनिधी गोळा करत असल्याचा दावा करीत किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतर आरोपींनी मुंबईत जागोजागी ‘डोनेशन बॉक्स’ लावले व त्या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळले, असा आरोप करीत माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलिसांत तक्रार केली होती. भोसले यांनी 2000 रुपये दिले होते. मात्र वर्षभरातच युद्धनौका भंगारात निघाल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा दावा
घोटाळ्याच्या अधिक तपासावेळी विविध लोकांचे जबाब नोंदवले. त्यात राजभवनच्या अंडर-सेक्रेटरींचाही समावेश आहे. साक्षीदारांच्या जबाबानुसार, चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेरील आवारात डिसेंबर 2013 मध्ये मदतनिधी संकलन मोहीम राबवली होती. तेथे सोमय्या व त्यांची टीम निधी गोळा करीत होती व त्यावेळी 12,881 रुपये जमा झाले होते. अन्य ठिकाणी निधी गोळा केल्याचे तसेच निधी अन्यत्र वळता केल्याचे ठोस पुरावे नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
कोर्टाने पोलिसांवर ओढले होते ताशेरे
ऑगस्टमध्ये क्लोजर रिपोर्ट फेटाळताना न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले होते. आरोपी सोमय्या पिता-पुत्राने मदतनिधीच्या नावाखाली लोकांकडून जमवलेल्या पैशांचे काय केले? याचा थांगपत्ता लावण्यासाठी पोलिसांनी योग्य तपास केलेला नाही. आरोपींनी चर्चगेट रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणी लोकांकडून पैसे गोळा केले. पण पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पैसे दिलेल्या लोकांचे जबाब नोंदवण्यासाठी कुठलीही तसदी घेतलेली दिसत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.