हाथरसच्या भोलेबाबाला क्लीनचिट; एसडीएम, सीओ, तहसीलदार, इन्स्पेक्टरसह 6 जण निलंबित

हाथरसच्या भोले बाबा सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जण मृत्यूमुखी पडल्यानंतर सात दिवसांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पहिली कारवाई केली आहे. मात्र, कारवाईची कुऱहाड एसडीएम, सीओ, इन्स्पेक्टरसह सहा अधिकाऱयांवर पडली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अनुयायांना मृत्यूच्या दारात सोडून निघून गेलेल्या भोले बाबाला मात्र एसआयटीने अहवालात क्लीन चिट दिली आहे.

या प्रकरणी सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एसआयटीने 900 पानांचा अहवाल सादर केला. या अहवालातील 9 बाबींचा उल्लेख करत सरकारने आज एक निवेदन जारी केले असले तरी त्यात भोले बाबाचे नाव कुठेही नाही. उलट आयोजक आणि प्रशासकीय अधिकाऱयांचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत ठरला असल्याचे म्हटले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनापाठोपाठ शासनाकडूनही भोले बाबा यांना पाठीशी घालण्यात आले आहे.

त्रिस्तरीय चौकशी, दोन अहवाल
अपघातानंतर 24 तासांनंतर आयोजकांना जबाबदार ठरवणारा पहिला अहवाल एसडीएमने प्रशासनाला सादर केला. एसआयटीने सोमवारी योगी सरकारला दुसरा अहवाल सादर केला. याशिवाय न्यायालयीन चौकशी आयोगही स्थापन करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. आयोग 2 महिन्यांत तपास पूर्ण करून सरकारला अहवाल सादर करेल.

सर्वेच्च न्यायालयात याचिका
या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली पाच सदस्यीय पथकाकडून करण्याची मागणी करणारी याचिका सर्वेच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ही याचिका सुनावणीच्या यादीत घेण्याचे निर्देश आपण कालच दिले होते, असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याचे वकील विशाल तिवारी यांना सांगितले. या अपघातामागे कटकारस्थान असण्याची चौकशी करण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

– मुख्यमंत्र्यांनी अपघातानंतर 24 तासांत अहवाल मागवला होता. मात्र, तपास पूर्ण करण्यासाठी एसआयटीला 6 दिवस लागले. आग्रा झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ हे एसआयटीचे प्रमुख आहेत.

कुणावर झाली कारवाई
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱयांमध्ये एसडीएम रवींद्र कुमार, सीओ आनंद कुमार, इन्स्पेक्टर आशिष कुमार, तहसीलदार सुशील कुमार आणि चौकी प्रभारी कचौरा मनवीर सिंग आणि पॅरा आउटपोस्ट इन्चार्ज ब्रिजेश पांडे यांचा समावेश आहे.