
आपल्या धावत्या जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टी आपण मागे सोडून पुढे धावत चाललो आहोत. पण असे असले तरी, आजही अनेक गावखेड्यांमध्ये काही जुन्या पद्धतींचा अवलंब करूनच स्वयंपाक केला जातो. ही जुनी पद्धत म्हणजे मातीच्या भांड्यात अन्न शिजवणं. पूर्वीच्या काळी मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक हा चवीला तर अप्रतिम लागायचाच. मुंबईसारख्या घरांमध्ये आज मातीची भांडी दिसू लागली आहेत. खास मातीच्या भांड्यात पदार्थ घरी शिजू लागलेला आहे. आताच्या घडीला आपल्याकडे स्वयंपाक करण्यासाठी हजारो मशीन, वेगवेगळी उपकरणे बाजारात आहेत. पण असे असले तरी कधीतरी मातीच्या डेचकीत किंवा गाडग्यामध्ये चिकन, मटण किंवा साधी आमटी करून बघा. मातीच्या भांड्यातलं गोडं वरण म्हणजे वाह स्वर्गसुख. वाफाळता भात, गोड वरण आणि वर तुपाची धार जोडीला एक लिंबाची फोड. बस्स्…
नेहमीच्या अॅल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांपेक्षा मातीची भांडी वापरल्यास आरोग्यास ते लाभदायक ठरते हे आता सिद्ध झालेले आहे. म्हणूनच आपल्याकडे आता अनेक घरांमध्ये मातीची भांडी वापरण्यास सुरुवात झालेली आहे.
मातीच्या भांड्यातला जेवणाला एक सुंदर सुवास येतो. शिवाय हे जेवण अधिक पौष्टिक असते.
मातीच्या तव्यावर तव्यावर चपाती करतांना इतका सुंदर सुंगध येतो की विचारता सोय नाही. मातीच्या तव्यावर पोळीवर तुप लावुन वरुन साखर घालावी यासारखं दुसरं सुख नाही. तुप साखर पोळी खायची तर मातीवरच्या तव्यावरची. गरम पोळी करायची आणि पानात घेऊन खायची.
मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यास आपल्याला होणार गॅसचा त्रास हा नाहीसा होतो. तसेच कॅल्शियम, सल्फर, सिलीकॉन, कोबाल्ड आणि अशी अनेक पोषक तत्त्वंं मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मिळतात.
मातीची भांडी घेताना एक गोष्ट मात्र काळजीपूर्वक बघायला हवी. ती म्हणजे भांडे जाड बुडाचे घ्यावे. म्हणजे ते पटकन फुटणार नाही. शिवाय मातीची भांडी घरी आणल्यावर लगेच आपण वापरू शकत नाही. किमान दोन दिवस कोमट पाण्यात ही भांडी भिजवावी लागतात. मगच ही भांडी वापरण्यायोग्य होतात. भांडी कोमट पाण्यात भिजवताना, त्यामध्ये थोडे गव्हाचे पिठ घालावे म्हणजे भांड्याचा मातकट वास येत नाही.