उत्तर प्रदेशातील मेरठमधून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12वीच्या विद्यार्थ्याने आपल्याच 11 वीत शिकणाऱ्या मित्राची डोक्यावर हातोड्याने वार करून हत्या केली. मृत विद्यार्थ्याने मित्राच्या मोबाईलवरून त्याच्या मैत्रिणीचे काही फोटो आणि व्हिडिओ स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले होते. याच रागातून आरोपीने मित्राचा जीव घेतला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे प्रकरण मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. वर्तिका सिटी येथील किराणा व्यापारी सुनील कुमार यांचा मुलगा अभिनव कुमार हा 11 वीचा विद्यार्थी होता. शनिवारी अभिनव ट्युशन क्लासेसला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. यानंतर कुटुंबीयांनी अभिनवला अनेक फोन कॉल्स केले. मात्र त्याच्यासोबत संपर्क न झाल्याने त्यांनी कोचिंग सेंटरमध्ये जाऊन विचारणा केली असता, कोचिंग सेंटर बंद असल्याचे समजले.
अभिनवचा कोचिंग सेंटरमध्ये नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला आणि पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही अभिनवचा शोध सुरू केला. पोलीस तपासात अभिनव आणि त्याचा मित्र एकत्र फिरत असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी चौकशी दरम्यान अभिनवच्या मित्राने अभिनवच्या खुनाची कबुली दिली.
अभिनवच्या मित्राने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. अभिनवच्या मोबाईलमध्ये आरोपीचे प्रेयसीसोबतचे फोटो असल्याचे आरोपीने सांगितले. अभिनवने ते फोटो आरोपीच्या मोबाईलमधूव घेतले होते. तेव्हापासून अभिनव आरोपीच्या प्रेयसीला फोटो पाठवत तिला भेटण्याचा हट्ट करत होता. यामुळे आरोपीने अभिनवला कोणत्या तरी बहाण्याने बोलावून भानवापूरमधील काली नदीजवळील नेले. यानंतर त्याच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला. अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
पोलिसांनी अभिनवचा मृतदेह भवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.