जम्मू-कश्मीरला कलम 370चा दर्जा पुन्हा बहाल करण्यावरून आज चौथ्या दिवशीही विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मार्शल्सनी आमदारांना अक्षरशः फरफटत नेले. अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी आज पुन्हा कलम 470 बहाल करण्याबाबतचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना रोखले. दरम्यान, गदारोळानंतर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला.
कामकाज सुरू झाल्यानंतर 370 कलमावरून आमदारांमध्ये बाचाबाची झाली. एक आमदार टेबलावर चढला तर दुसरीकडे मार्शने खुर्शीद अहमद यांना ओढून नेले. या वेळी झालेल्या धक्काबुक्कीत खुर्शीद जमिनीवर कोसळले. त्यांना खेचत बाहेर काढण्यात आले. खुर्शीद हे बारामुल्लाचे खासदार अभियंता राशीद यांचे बंधू आहेत. राशीद यांना 2016मध्ये यूएपीए अंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.