मिंधेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोलापुरात राडा, मंत्री गोगावलेंसमोरच शिवीगाळ; गचांडी पकडून हात उचलला

सोलापुरात सात रस्ता परिसरामध्ये मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यासमोरच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. गचांडी पकडून शिवीगाळ करीत हात उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी शहरप्रमुख मनोज शेजवाळ यांना समाज व पक्षातून निलंबित केल्याचा आरोप केल्याने वातावरण तापले होते. मंत्री गोगावले यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले हे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता परिसरातील कार्यालयात बसलेले असताना, माजी मंत्री तानाजी सावंत गटाचे शहरप्रमुख मनोज शेजवाळ आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात येऊन काजळे यांना जाब विचारू लागल्याने वाद वाढला. या वादादरम्यान शेजवाळ यांनी काळजे यांची गचांडी पकडत बाहेर चल म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. याची माहिती मंत्री गोगावलेंना कळताच, त्यांनी तातडीने बाहेर येऊन दोघांना आवरले. तरीही काळजे व शेजवाळ यांच्या समर्थकांत शिवीगाळ, घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे सात रस्ता परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते.

या वादादरम्यान मनीष काळजे यांनी समाज व पक्षातील निलंबनावरून मनोज शेजवाळ यांना अर्वाच्च भाषेत बोलल्याने हा वाद वाढल्याची चर्चा सुरू होती. मनोज शेजवाळ हे तानाजी सावंत गटाचे ओळखले जातात. काळजे व शेजवाळ यांच्या गटातटामुळे हाडवैर आहे.

काळजे हा पक्षाच्या नावाने धंदा करतो

मनीष काळजे हा ग्रामीणचा जिल्हाप्रमुख आहे. शहरात तो पक्षाच्या नावाने धंदा करत असून, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शहरप्रमुख मनोज शेजवाळ यांनी केला आहे. काळजेमुळे बदनामी होत असून, कार्यकर्ते बाहेर पडत आहेत, असेही त्यांनी सांगितले.