जम्मू काश्मीरच्या कुलगावमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, शोधमोहिम सुरु

दक्षिण काश्मीरमधील कुलगाव जिल्ह्यातील बडीामार्ग यारीपोराजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे.परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक सुरू झाली. चोवीस तासांतील ही दुसरी चकमक आहे. याआधी मंगळवारी उत्तर काश्मीरमधील एलओसीला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात जवानांनी तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा येथील नागमार्गामध्ये दहशतवादी दिसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी पहाटे कारवाई सुरू केली. उंचावरील घनदाट झाडांच्या आच्छादनाखाली दहशतवादी लपून बसले आहेत. त्यांना घेरण्यासाठी सुरक्षा दलाचे एक पथक कुपवाडा येथून तर दुसरे पथक बांदीपोरा जिल्ह्यातील रुबांदीपोर भागातून रवाना झाले.

जम्मू काश्मीरच्या कुलगावामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.या चकमकीत किती दहशतवादी सामील आहेत याबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी नाही आणि सुरक्षा दलांनी परिसरात संपूर्ण सतर्कता ठेवत कारवाई सुरू ठेवली आहे.सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून अद्यापपर्यंत एकही दहशतवादी मारला गेला किंवा पकडला गेल्याची माहिती नाही. 2-3 दहशतवादी जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान प्रत्युत्तराच्या कारवाईत आहेत.