ईडीचा अधिकारी असल्याचे सांगूनही होते आर्थिक फसवणूक, रत्नागिरीकरांनो सावध रहा; पोलीसांचे आवाहन

तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात सुद्धा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेअर मार्केट किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. शेअर मार्केट किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार सुरु आहेत. सायबर गुन्हेगार हे पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून पिडीत व्यक्तीला फोन करतात आणि आपल्या खात्यावर मनी लॉंड्रीँगचा पैसा जमा झाल्याचे सांगून फसवणूक करतात. अशा फसवणूकीला बळी पडू नका. तात्काळ पोलीसांशी संपर्क साधा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून पिडीत व्यक्तीला फोन केला जातो. पिडीत व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करून बनावट सीमकार्ड खरेदी केले जाते. त्या आधारे फोन कॉल करून तुमच्या नावावर कोणीतरी बँक अकाऊंट सुरु केले आहे व त्यावर मनी लॉंड्रीँगचा पैसा जमा झाला आहे आणि आता तुमची चौकशी लागणार आहे. तुमचे बँक खाते आणि मालमत्ता जप्तं केली जाणार आहे असे सांगितले जाते. हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्ही पैसे द्या किंवा तुमचा सहभाग नसल्याचे सिध्द करण्यासाठी बँक खाते व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. त्याकरीता पैसे पाठवा व्हेरिफिकेशन झाल्यावर पैसे परत पाठवले जातील असे सांगून आर्थिक फसवणूक केली जाते. अशा गुन्ह्यांपासून नागरीकांनी सावध रहावे आणि तात्काळ डायल ११२ किंवा मोबाईल क्रमांक 88230404650 या क्रमांकावर संपर्क साधावा. अनोळखी कॉल आणि अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नयेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे