बनावट कागदपत्रांच्या आधारे अपघात नुकसानभरपाई मागणे अंगलट, हायकोर्टाने दिले गुन्हा नोंदवण्याचे आदेश

अपघातात मृत्यू झालेल्या मुलाच्या नुकसान भरपाईसाठी बनावट कागदपत्रे सादर करणे एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने नुकसानभरपाई मागणारी आई व दोन भावंडांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत

न्या. संजय देशमुख यांच्या एकल पीठाने हे आदेश दिले. या दाव्यासाठी मदत करणाऱया पोलीस तपास अधिकाऱयाविरोधात गुन्हा नोंदवा, असेही न्यायालयाने विमा कंपनीला सांगितले आहे. या प्रकरणात न्यायालय प्रशासनाने न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई सुरू करावी, असे निर्देश न्या. देशमुख यांनी दिले आहेत. पीडिताच्या नातलगांना 50 हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला.

काय आहे प्रकरण

नागपूर येथील सलमान खानचे अपघातात निधन झाले. त्याची आई व दोन भावंडांनी मोटार अपघात दावा प्राधिकरणात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. प्राधिकरणाने 7 लाख  49 हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली. विमा कंपनीने प्राधिकरणाच्या आदेशाविरोधात नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली.

कंपनीचा दावा

सलमान खानच्या कुटुंबीयांनी खोटी कागदपत्रे सादर करून दावा दाखल केला. सलमान खान नेमका कुठे कामाला होता व काय काम करत होता याची माहिती दिली गेली नाही. तरीही सलमानच्या कुटुंबीयांचा दावा प्राधिकरणाने मंजूर केला. महत्त्वाचे म्हणजे, दावा करणारे नातलग सलमानसोबतचे नाते स्पष्ट करणारी कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. प्राधिकरणाने मंजूर केलेली रक्कम रद्द करावी, असा दावा विमा कंपनीने केला.

नातलगांचा युक्तिवाद

सलमानची आई म्हणून माझे नाव एफआयआरमध्ये नमूद आहे. नुकसानभरपाई दाव्याची सर्व कागदपत्रे खरी आहेत. प्राधिकरणाने दिलेला निर्णय योग्यच आहे, असा युक्तिवाद आई व भावंडांकडून करण्यात आला.

न्यायालयाचे निरीक्षण

सलमानचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला व आधारकार्ड सादर करण्याचे निर्देश त्याच्या नातलगांना देण्यात आले होते. मात्र त्यांनी ही कागदपत्रे सादर केली नाहीत. अपघातात नेमका कोणाचा मृत्यू झाला याचा तपास पोलिसांनी करायला हवा होता, पण याचा तपास योग्य प्रकारे झालेला नाही. नातलगांनी पोलीस अधिकाऱयाला हाताशी धरून खोटी कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.