शेअर बाजारात तेजी, CJI चंद्रचूड यांचा सावधगिरीचा इशारा; SEBI, SAT ला दिल्या महत्त्वाच्या सूचना

शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा पार केला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 24 हजारांपार पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात पैसा गुंतवत आहेत. यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सावधगिरीचा इशारा देत सेबी आणि सॅटला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

मुंबईतील मित्तल कोर्ट येथील सॅटच्या नवीन पीठाचे उद्घाटन सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शेअर बाजारातील तेजीवर भाष्य केले. निर्देशांक 80 हजारांपार पोहोचल्याच्या काही बातम्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्यामुळे सॅट आणि सेबीवरील जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यावरील कामाचा ताणही वाढला आहे. अशा स्थितीत स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सेबी आणि सॅट सारख्या संस्था महत्त्वाची भूमिका निभावतात. बाजारात जशी तेजी येते, तशी सेबी आणि सॅटची भूमिका वाढते. या संस्था सावध राहतील आणि योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षाही सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.

आपली गुंतवणूक सुरक्षित असून समस्यांच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत असा विश्वास गुंतवणकूदारांना आहे. यामुळे आगामी काळात शेअर बाजारात गुंतवणूक अधिक वाढण्याची शक्यता असून याचे चांगले आर्थिक परिणामही पहायला मिळू शकतात. यामुळे भांडवल निर्मिती, रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासात वाढ होईल, असेही ते म्हणाले.

सॅट ही संस्था पंचाची भूमिका पार पडते. आर्थिक क्षेत्रातील तीव्र स्पर्धात्मक जगात सर्व भागाधारक नियमांचे पालन करतात की नाही हे सुनिश्चित करण्याचे काम ही संस्था करते. शेअर बाजार आणि व्यवसाय अधिक किचकट झाले असून नव्या नियमांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आव्हानांना तोंड देण्यासाठी ट्रिब्यूनलने स्वत:ला तयार ठेवावे, असा सल्लाही सरन्यायाधीशांनी दिला.