सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखागाराचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेवर आधारित वकिलांशी संवाद साधला. हिंदुस्थानात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे का? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला असता, होय हिंदुस्थानात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे. एखाद्या दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारात सर्वोच्च न्यायालय अपवादात्मक परिस्थितीत जघन्य गुह्यात फाशीची शिक्षा सुनावू शकते, असे उत्तर एआय वकिलांनी दिले. त्यांचे उत्तर ऐकून सरन्याधीश इतर न्यायाधीश आणि वकिलांकडे पाहून हसले. कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे संग्रहालय संवादी बनवावे. विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला नक्कीच भेट द्यावी, असे आवाहनही सरन्यायाधीशांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे चित्र होते. ज्या जागेवर संग्रहालय उभारण्यात आले आहे, त्या ठिकाणी वकिलांसाठी वाचनालय आणि कॅफे लाइंज बांधले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे उद्घाटनाच्या एक दिवस आधी बार असोसिएशनने कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.