Yeah… yeah काय लावलंय, Yes म्हणा! सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान वकिलाची घेतली शाळा

न्यायालयात कामकाज सुरू असताना एका शिस्तीत हे काम सुरू असते. तिथे काही संकेत पाळावे लागतात, शिष्टाचार पाळावा लागतो. मात्र काहीवेळी वकिलांकडून मर्यादा ओलांडली जाते, शिष्टाचार पाळले जात नाहीत. मात्र न्यायाधीश अशा गोष्टींना वेळीच निदर्शनास आणून त्याचे पावित्र्य आणि महत्त्व कायम ठेवण्याचे काम करतात. असा एक प्रसंग नुकताच घडला असून देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान उपस्थित असलेल्या एका वकिलाला चांगलच फटकारलं. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ‘येस’ (Yes) ऐवजी ‘याह'(yeah) असा शब्द वापरण्याला वकिलाला चांगलंच सुनावलं. अशा प्रकारे बोलणाऱ्या लोकांची ‘थोडी एलर्जी’ आहे असं म्हणतानात त्यांनी वकिलाला आठवण करून दिली की ते ‘कोर्ट रूममध्ये आहेत कॉफी शॉपमध्ये नाही’.

न्यायालयाच्या कामकाजावेळी अनौपचारिक शब्दात बोलणाऱ्या वकिलाची सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शाळाच घेतली. संबंधित वकिलाने माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. चंद्रचूड यांनी विचारले की, ‘न्यायाधीशांना प्रतिवादी म्हणून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता’, त्यावर वकील म्हणाले, ‘yeah… yeah… तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई… मला क्यूरेटिव्ह फाइल करण्यास सांगितले होते.’

वकिलाकडून युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हस्तक्षेप केला आणि म्हणाले, ‘yeah… yeah… म्हणू नका. Yes म्हणा. हे कॉफी शॉप नाही. हे न्यायालय आहे. मला याह म्हणणाऱ्या लोकांची थोडी ॲलर्जी आहे’.

सरन्यायाधीशांनी कोर्टातील वकिलांना न्यायालयातील शिष्टाचारांची आठवण करून देण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्चमध्ये, NEET-UG सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

नेदुमपारा यांनी खंडपीठाला संबोधित करणारे दुसरे वकील नरेंद्र हुडा यांना अडवले तेव्हा ही घटना घडली. थांबण्यास सांगितले असतानाही, नेदुम्परा हे बोलतच राहिले आणि दावा देखील केला की ते सर्वात ज्येष्ठ वकील आणि मित्र आहेत. सरन्यायाधीशांनी उत्तर दिलं की त्यांनी कोणत्याही मित्राची नियुक्ती केलेली नाही आणि नेदुम्परा यांना खंडपीठाला संबोधित करण्यापासून सावध केलं.