लातुरात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, मालमत्ता जप्त करण्याचा दिवाणी न्यायाधीशांचा आदेश

न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान प्रकरणात लातूर येथे मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर लातूर यांनी दिला आहे.

या प्रकरणी अ‍ॅड. गुरुराज व्ही.संदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील आशा नागनाथ होनकर यांनी वाटणीचा दिवाणी दावा दाखल केलेला होता. प्रकाश पुंड आणि आशा होनकर यांची संयुक्त मिळकत खरेदी होती. परंतु, प्रकाश पुंड यांनी 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर खरेदीखत तयार करून सदर मिळकतीची परस्पर विक्री केली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर आशा होनकर यांनी खरेदीखत रद्द करावे आणि वाटणी मिळावी, असा दावा प्रकाश पुंड यांचे वारसदार अलका प्रकाश पुंड आणि अनुज्ञा प्रकाश पुंड, तसेच खरेदीदार रामभाऊ मारुती चिखले, संगीता अरुण अर्दाळकर, अरुण महादेव अर्दाळकर यांच्याविरुध्द दाखल केला होता.

दि.30/7/2019 रोजी न्यायालयाने वादग्रस्त जागा विक्री करू नये, असा मनाई आदेश पारित केलेला होता. दरम्यान या आदेशाविरुध्द अपील दाखल करण्यात आले होते. पण ते फेटाळण्यात आले होते. तरीही नंतर खरेदी-विक्री व्यवहार मनाई हुकूम डावलून करण्यात आला. त्यामुळे स्वतंत्र अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर 2 रे, लातूर न्यायाधीश ए.ए. गोडसे यांनी सदरील मिळकत जप्त करण्याचा आदेश पारित केला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. गुरुराज व्ही.संदीकर यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड.एस.एस. बिडवे आणि पी.जी. चंदनगीरे यांनी सहकार्य केले.