अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंड प्रकरण, शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी

अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणी काँग्रेसने शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसे प्रसिद्धी पत्रक युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी जारी केले आहे. राज्यभर गाजत असलेल्या नगरमधील एमआयडीसी पोलिसांनीही मोठी कारवाई केली आहे. प्रवीण गीतेसह 12 आरोपींवर पोलिसांनी अपहरणाचे, बाल लैंगिक अत्याचार पोस्को कलम 12 सह बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 वाढवले आहे. यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील खोट्या आरोपांचे खंडन केले होते. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे कडक कारवाईची आणि या प्रकरणाच्या खऱ्या मास्टरमाईंडच्या सखोल चौकशीची मागणी केली होती.

यानंतर त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, गुन्ह्याचे तपास अधिकारी विनोद परदेशी यांनी सूत्रे हलवत शोध मोहीम राबवली. रात्री साडे अकराच्या सुमारास पप्पू पगारे (रा. नवनागापूर), सोनू शेख (रा. वडगाव गुप्ता) या दोघांना अटक करण्यात केले. अद्यापही सहा आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पगारे, शेख यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे. पोलीस खऱ्या मास्टरमाईंडचा कसून तपास करत आहेत.