मुंबईकरांनी तब्बल 71 हजार कोटींचा जीएसटी बुडवल्याचे समोर आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 2.1 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीशी संबंधित 6,084 प्रकरणे शोधून काढल्याचे जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने म्हटले आहे. ही रक्कम 2022-23 मध्ये 4,872 प्रकरणांमध्ये आढळून आलेल्या 1.01 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीच्या दुप्पट असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, जीएसटी बुडवण्यात दिल्लीकर दुसऱ्या स्थानावर आहेत.
ऑनलाइन गेमिंग, बँकिंग, विमा सेवा आणि धातू व्यापार हे करचुकवेगिरीत सर्वात पुढे असल्याचे जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने म्हटले आहे. 2023-24 मध्ये 26,605 कोटी रुपयांचा ऐच्छिक कर भरला गेला आहे, जो 2022-23 मध्ये 20,713 कोटी रुपये इतका होता. जीएसटी चोरीमध्ये 70,985 कोटी रुपयांसह मुंबई अव्वल स्थानी असल्याचे जीएसटी महासंचालनालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.
ऑनलाइन गेमिंगमध्ये सर्वाधिक जीएसटी चोरी
2023-24 मध्ये ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील तब्बल 78 प्रकरणांमध्ये 81,875 कोटी रुपयांची करचोरी आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. यानतंर बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील 171 प्रकरणांमध्ये 18,961 कोटी रुपयांची करचोरी आढळून आली. लोखंड, तांबे, भंगार आणि मिश्र धातू क्षेत्रातील जीएसटी चोरीची 1,976 प्रकरणे आढळून आली. परिणामी 16,806 कोटी रुपयांची करचोरी झाली आहे. यानंतर पान मसाला, तंबाखू, सिगारेट आणि विडी उद्योगांमध्ये 212 प्रकरणांसह 5,794 कोटी रुपयांची करचोरी नोंदवली गेली आहे.