>>प्रा. अनिल कवठेकर
संसारातील छोटी-मोठी भांडणं आणि जगात घडणाऱया गोष्टी केवळ एका शब्दाने टाळता येऊ शकतात. जर त्या व्यक्तीने योग्य वेळ साधून, माझं चुकलंय, मला क्षमा करा, सॉरी अशी माफी मागणे. मला क्षमा करा, असं म्हणण्यापेक्षा ‘सॉरी’ म्हणणं हे खूप सोपं आणि सहज वाटू लागलं. तरीसुद्धा जबाबदार, अनेकांच्या चांगल्या आणि वाईटाला कारणीभूत ठरलेल्या व्यक्ती ‘सॉरी’ हा शब्द उच्चारताना कचरतात. युद्ध संपवणारा, शांती प्रस्थापित करणारा हा शब्द केवळ इगोमुळे उच्चारायला टाळाटाळ करतात. यातूनच उभा राहतो ‘धमाका’ हा चित्रपट.
साऊथ कोरियन थ्रिलर टेरर लाइव्ह या चित्रपटाच्या कथेवर ‘धमाका’ बेतलेला आहे. मुंबईच्या वरळीच्या सागरी सेतूवर ज्या मजुरांनी कधीकाळी काम केलं होतं आणि ते काम करत असताना त्यातील काही मजूर समुद्रात पडून मृत्यू पावले होते. अपघातातून होणारी अशी घटना पण तेव्हा सरकारने त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली नाही वा क्षमा मागितली नाही. पण आता एका व्यक्तीला वाटतंय की, मंत्र्याने माफी मागावी म्हणून तो संपूर्ण मुंबईला वेठीस धरतो. लोक मृत्युमुखी पडावेत अशी त्याची इच्छा नसते. पण तरीही मृत्यूचे तांडव घडत राहते. ज्याने माफी मागायला हवी तो मंत्री शेवटपर्यंत पुढे येत नाही. अशा आशयाचा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा म्हणजे ‘धमाका’ होय.
चित्रपट सुरू होतो तेव्हा एका रेडिओ चॅनलच्या स्टुडिओमध्ये रेडिओ जॉकी अर्जुन पाठक (कार्तिक आर्यन) बडबड करत असताना त्याला एक कॉल येतो. त्या कॉलवर बोलणारा माणूस बोलताना यूपीमधल्या कामगारासारखा बोलत असतो. सुरुवातीला काही घटना घडतात. त्या प्रत्येक घटनेची अर्जुनच्या आयुष्याशी एक जुळणी आहे. ती जोड जेव्हा अर्जुनला कळते तेव्हा त्याला जाणवतं की, एक टीव्ही अँकर म्हणून त्याची काय जबाबदारी आहे. हा चित्रपट नसरुद्दीन शाहच्या ‘वेन्सडे’ची आठवण करून देतो. चित्रपटाच्या सुरुवातीला अर्जुन पाठकच्या हातात त्याच्या घटस्फोटाची फाईल आहे. त्याचं लव्ह मॅरेज असतं आणि काही क्षुल्लक कारणांवरून घटस्फोटापर्यंत गोष्ट गेलेली असते. त्याच्या मनाला त्याची खंत आहे. तो अस्वस्थ आहे. घटस्फोट घेणं त्याला पटत नसतं. पण पुरुषी अहंकारामुळे त्याच्यावर ती वेळ आलेली असते.
वरळी सी लिंकवर बॉम्बस्फोट झाल्यानंतर तो त्याच्या बॉसला (अमृता सुभाष) ही गोष्ट सांगतो आणि आपल्या चॅनलचा टीआरपी वाढण्यासाठी अर्जुनचा उपयोग केला जातो. अर्जुनलाही त्याच्या करिअरमध्ये प्राईम टाईमवर बोलण्याची संधी हवी असते आणि या कॉलमुळे त्याला ती संधी आपोआप चालून येते. पण त्या संधीमागे काय काय दडलंय हे त्याला माहीत नसतं. टीआरपी वाढवण्यासाठी अर्जुनचा आणि या घटनेचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा विचार केला जातो. या सगळ्या गदारोळात हळूहळू चित्रपटाचा विषय आपल्यासमोर येतो. तो विषय म्हणजे सी-लिंकचे दुरूस्तीचे बांधकाम करताना काही मजूर दोरी तुटल्याने समुद्रात पडतात. त्यांना वाचवायला कोणीही जात नाही आणि याचा बदला घेण्यासाठी त्या तीन मजुरांपैकीच एकाचा नातेवाईक सी-लिंक उडवण्याची योजना आखतो. तो बोलताना गावंढळ वाटला तरी तो तांत्रिकदृष्टय़ा हुशार आहे. त्याचा मोबाइल कोणीही ट्रेस करू शकत नाही.
स्टुडिओमध्ये बसलेल्या अँकरच्या हेडफोनमध्येही तो बाँब ठेवतो. स्टुडिओमध्ये आलेल्या मंत्र्याच्या कानात बॉम्बस्फोट करून त्याला तो ठार मारतो. हे थोडंसं अतार्किक आहे. यासाठी एक मोठी टीम लागते, पण हा एकटाच हे सगळं करत असतो. चित्रपट एक तास चाळीस मिनिटांचा आहे. पहिल्या एक तासात व्हिलनचा फक्त आवाज ऐकू येतो. त्याला व्हिलन म्हणायचं की न्याय मागणारा अँटी हीरो म्हणायचं हा प्रश्न पडतो. कारण त्याच्या मागण्या कोटय़वधी रुपयांच्या नाहीत तर खूपच सामान्य आहेत. जो मंत्री या गोष्टीला जबाबदार आहे त्याने स्टुडिओमध्ये येऊन कॅमेऱयासमोर मृत झालेल्यांची माफी मागावी ही त्याची मागणी असते. माफी मागितल्यानंतर तो बॉम्बस्फोट करणार नाही असे सांगतो. तसंच तो पोलिसांना शरण जायलाही तयार आहे. मात्र अट एकच मंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे. त्याचं न ऐकल्यामुळे तो करत असलेले बॉम्बस्फोट त्याला त्रासदायक होत असल्याचं त्याच्या संवादावरून वाटतं. म्हणजेच तो सराईत गुन्हेगार नाही.
आजच्या व्यवहारातील सत्य मांडताना आजच्या काळातील
चॅनलवाले जो धुमाकूळ घालतात त्या सगळय़ा चॅनेल्सना आणि अँकर्सना हा चित्रपट एक सणसणीत चपराक देतो. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून गावातले लोक जगत असतात. त्यांना फसवण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. या अँटी हिरोने अर्जुनलाच का निवडलं याचंही तो कारण सांगतो. तो म्हणतो, ‘आमच्या गावातील सगळी माणसं केवळ तुमचं भरोसा चॅनेल बघतात आणि तुम्ही जेव्हा ‘भरोसा चॅनेल से जो भी कहूंगा सच कहूंगा’ इतकं प्रभावीपणे बोलता की तुमचा अभिनय आम्हाला खरा वाटतो. तुमच्या आवाजामुळे लोकांना खात्री वाटते की, तुम्ही सत्य बोलणार आहात.’
अर्जुनच्या ‘भरोसा’ चॅनेलचा टीआरपी वाढतो. अर्जुनचं आणि त्या अँटी हीरोचं बोलणं इतर चॅनेलवाले ऐकतात आणि अर्जुनही भ्रष्टाचारी आहे, खोटं बोलणारा आहे याचे पुरावे गोळा करायला लागतात आणि ते पुरावे आपापल्या चॅनेलवरून दाखवू लागतात. त्यामुळे अँटी हीरो अर्जुनवर नाराज होतो. त्याची भूमिका बदलू लागते. आता त्या अतिरेक्याला पकडणं महत्त्वाचं आहे. पण चॅनेलवाले यासंदर्भात काही न करता हे युद्ध आणखीन काही वेळ कसं चालू राहील यावर लक्ष केंद्रित करतात. चॅनेलमधले टीआरपी युद्ध इथे आपल्याला पाहायला मिळतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली भूमिका विसरत चालला आहे. हे वारंवार अनेक चित्रपटांत यायला लागलेलं आहे त्यातलाच हा एक चित्रपट आहे.
तो अँटी हीरो जेव्हा त्यांनी फक्त माफी मागितली पाहिजे असे म्हणतो तेव्हा अर्जुनच्याही लक्षात येतं की, आपण खूपच इगो ठेवून राहिलो. नाहीतर बायकोसोबत इतका वाद झाला नसता. अतिरेक्याच्या आणि अर्जुनच्या संवादात अर्जुनला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागते. या घटनेने अर्जुन जागा होतो असं म्हणायला हरकत नाही. बाहेर एक युद्ध सुरू आहे आणि त्याच्या मनात दुसरं युद्ध सुरू आहे. त्याच सी-लिंकवर त्याची पत्नी लाइव्ह न्यूज कव्हर करायला गेलेली आहे आणि तिचा अन् त्याचा, चॅनेलचा संपर्क तुटतो. तो अस्वस्थ होतो…
चित्रपट सामाजिक नात्यातील द्वंद सांगतो. दोन चॅनेल मधली जीवघेणी स्पर्धा, संघर्ष मांडतो. या जीवघेण्या शर्यतीत कोणीही कोणाचा मित्र नाही तसंच इथे प्रामाणिकपणालाही किंमत नाही. चॅनेलवर जे काही दाखवलं जातं तो प्रामाणिकपणाचा भ्रम असतो. चॅनेलवाल्यांच्या धुमाकूळीने सामान्य माणसाच्या आयुष्यात काय काय घडतं हेही हा चित्रपट सांगतो.
संपूर्ण चित्रपट एका स्टुडिओमध्ये शूट केलेला आहे. सी-लिंकवरच्या बॉम्बस्फोटचं फुटेज आपल्याला पाहायला मिळतं. बाहेर घडणाऱया सर्व गोष्टी आपल्याला चॅनेलच्या स्टुडिओमधल्या विविध पीनवर दिसतात. ‘धमाका’चे लेखक/दिग्दर्शक आहेत राम माधवानी. त्यांचं कौशल्य आपल्याला मानावं लागेल की त्याने चॅनेल हे माध्यम समोर ठेवून तिथली जीवघेणी शर्यत, जिथे देश, देशभक्ती नाही तर तिथे फक्त टीआरपीला महत्त्व आहे हा मुद्दा स्पष्टपणे मांडलेला आहे. त्यामुळे जे काही घडतं ते फक्त पीनवर दिसतं. प्रत्यक्षात कॅमेरा स्टुडिओच्या बाहेर प्रेक्षकांना घेऊनच जात नाही. अमृता सुभाषने अर्जुनच्या बॉसची भूमिका अतिशय कणखरपणे रंगवलेली आहे. प्रेमाने सांगताना आणि निर्वाणीचं सांगताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव लाजवाब आहेत. चांगल्या भूमिका वाटय़ाला आल्यानंतर मराठी कलावंत त्याचं चीज करतात ते पुन्हा एकदा या चित्रपटात स्पष्ट होतं. अँटी हीरो रघुवीरची भूमिका जयराम या अभिनेत्याने केलेली आहे. अर्जुनच्या पत्नी सौम्याची भूमिका मृणाल ठाकूरने केलेली आहे. एक वेगळा विषय म्हणून नक्की पाहायला हवा असा हा ‘धमाका’ आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)