
दिलेल्या मुदतीत बांधकाम झाले नाही म्हणून सिडकोने नवी मुंबई शहरातील 16 भूखंड जप्त केले. शहराच्या इतिहासातील पहिलीच मोठी कारवाई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जप्त केलेल्या भूखंडामध्ये वाशी येथील सेक्टर 26 मधील 38 हजार चौरस मीटरच्या भूखंडाचाही समावेश आहे. हा भूखंड व्यावसायिक संकुलासाठी व्यापाऱ्यांच्या एका संस्थेला मिळाला होता. या संस्थेचे सुमारे 500 व्यापारी सदस्य आहेत. सिडकोकडून निविदा प्रक्रियेत भूखंड आणली होती. या योजनेंतर्गत दंडाची रक्कम मिळाल्यानंतर करारनामा केला जातो.
करारनामा केल्यापासून चार वर्षांत या भूखंडाचा विकास करणे आवश्यक असते. जर या कालावधीत भूखंडावर बांधकाम उभे राहिले नाही तर संबंधित बांधकाम व्यावसायिकाला किंवा संस्थेला दंड भरून मुदत वाढवून घेता येते. भूखंड ताब्यात घेतल्यानंतर वेळेत बांधकाम न केलेल्या बांधकाम व्यावसायिकांसाठी सिडकोने मध्यंतरी एक योजना अर्धी कमी करण्यात आली होती. अनेक भूखंडधारकांनी या योजनेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सिडकोने आज धडक कारवाई करून ऐरोलीपासून ते बेलापूरपर्यंतचे 11 आणि खारघर, द्रोणागिरीमधील 5 भूखंड जप्त केले. या भूखंडांचे क्षेत्रफळ सुमारे 62 हजार चौरस मीटर आहे. सिडकोच्या इतिहासातील पहिल्याच कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिवाळीपर्यंत 150 भूखंडांवर कारवाई
भूखंडाच्या विकासाबाबत सिडकोने बांधकाम व्यावसायिकांना आणि सामजिक संस्थांना काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानुसारच भूखंडांचा विकास होणे आवश्यक आहे. भूखंडाचा करारनामा झाल्यानंतर त्याचा विकास ठरावीक मुदतीत होणे आवश्यक असते. नाही तर सदर भुखंडावर भूमाफियांकडून अतिक्रमण केले जाते. हे अतिक्रमण टाळण्यासाठी दिवाळीपर्यंत 150 भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी महिती सिडकोच्या सूत्रांनी दिली आहे.
साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट दिवशीच उगारला बडगा
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील जल पर्यटन ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवून दोन दिवस उलटले नाही तोच नगरविकास विभागाने नवी मुंबईत भूखंड जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नाईक यांनी एकनाथ शिंदे यांची मनमानी धुडकावून लावून ठाणे शहरात जनता दरबार सुरू केले आहेत. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्यास विरोध केला आहे. हा प्रकार मिंधे गटाच्या जोरदार जिव्हारी लागला आहे. त्यामुळे सिडकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवी मुंबईकरांना हैराण केले जात असल्याची प्रतिक्रिया रियल इस्टेट वर्तुळातून व्यक्त होत आहे.