सिडकोमधील काही अधिकारी नालायक आणि भ्रष्ट आहेत. पैशांसाठी नागरिकांना विनाकारण वेठीस धरतात. या अधिकाऱ्यांचा हिशोब चुकता करावाच लागणार असून सिडकोला नवी मुंबईतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नवी मुंबईत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याला टार्गेट केले. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाईक यांनी आज जनता दरबार घेतला. हा जनता दरबार सुमारे सात तास चालला. त्या वेळी नाईक यांनी सिडकोसह महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
नवी मुंबईत काम करणाऱ्या सर्वच प्राधिकरणातील काही अधिकारी हे भ्रष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी छळवणूक होत आहे. या अधिकाऱ्यांकडून कामे मार्गी लागत नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव आपली कामे घेऊन जनता दरबारात यावे लागत आहे. आजचा जनता दरबार सकाळी सुरू झाला होता. तो दोन-तीन तासांत संपेल असे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हा जनता दरबार सायंकाळपर्यंत चालला. सात तास सुमारे 500 नागरिकांनी आपल्या तक्रारी जनता दरबारात मांडल्या. सिडकोचे काही अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्ट आणि नालायक आहेत. त्यांच्याकडून नागरिकांची विनाकारण पिळवणूक होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही या बैठकीत करण्यात येणार आहे, असेही गणेश नाईक यांनी या वेळी जाहीर केले.
वशिल्याच्या माणसांचा हिशोब करणार
नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी अनेक जण सुमारे 13 वर्षे काम करीत आहेत. हा प्रकार त्यांच्या भावनेशी खेळण्यासारखा आहे. या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पालिकेसह अन्य प्राधिकरणात काही वशिलाच्या माणसांना घुसवण्यात आले आहे. या वशिल्याच्या लोकांचाही लवकरच हिशोब करण्यात येणार आहे, असाही टोला या वेळी नाईक यांनी लगावला.
सिडकोने आता काढता पाय घ्यावा
सिडकोने आता या शहरातून काढता पाय घ्यावा. सिडकोचे काम संपलेले आहे. या शहरातील जागा फ्री होल्ड होणे ही काळाची गरज आहे. जागा फ्री होल्ड करण्यासाठी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एक बैठक घेणार आहे. शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही गणेश नाईक यांनी या वेळी दिला.