CIDCO Lottery 2025 – सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या कीमती ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे

आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने घिसाडघाईत 26 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेची घोषणा केली होती. या घरांच्या किमती 30 लाख रुपयांच्या आसपास राहतील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती.

मात्र प्रत्यक्षात सिडकोने या घरांच्या किमती तळोजामध्ये 26 लाख, खांदेश्वर, मानसरोवरमध्ये 46 लाख, खारघरमध्ये 48 लाख आणि वाशीमध्ये तब्बल 74 लाख इतकी ठेवली आहे. परवडणारी पसंतीची घरे अशी जाहिरात करणाऱ्या सिडकोने मात्र प्रत्यक्षात घराच्या किमती अवाचे सवा वाढल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वसामान्य कुटुंबांना नवी मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोकडून 67 हजार घरांची निर्मिती सुरू आहे. ही घरे तळोजा, खारघर, कळंबोली, उलवे, पनवेल, वाशी, द्रोणागिरी या नोडमध्ये उभी राहत आहेत. यापैकी 26 हजार घरांची महागृहनिर्माण योजना सिडकोने 11 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली. खोके सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत घिसाडघाईत हा निर्णय घेतला. मात्र घरांच्या किमती जाहीर केल्या नाहीत. फक्त योजना जाहीर करून ऑनलाइन नोंदणी सुरू केली. या नोंदणीसाठी सिडकोने सुमारे तीन वेळा मुदतवाढ दिली. शेवटची मुदतवाढ येत्या 10 जानेवारी रोजी संपणार आहे.

त्यापूर्वीच सिडकोने आज घरांच्या किमती जाहीर करून सर्वांनाच जोरदार धक्का दिला. ही सर्व घरे आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी बांधण्यात आली आहेत. त्यामुळे त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र किमती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत.

किमती कमी करण्याची घोषणा हवेत विरली

लॉटरीची घोषणा झाल्यानंतर खोके सरकारने या घरांच्या किमती घटवण्याची घोषणा केली होती. वेळप्रसंगी ही घरे 10 ते 15 टक्क्यांनी स्वस्त होणार असेही सरकारकडून सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात किमती भरमसाट वाढल्याने सरकारची घोषणा हवेत विरली आहे. सर्वसामान्य कुटुंबांना वाशीसह नवी मुंबईचा दरवाजा आता कायमस्वरूपी बंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया रिअल इस्टेट तज्ज्ञ प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.

किमती चारपटीने वाढल्या

सिडकोने 2018 मध्ये विविध नोडमधील 15 हजार घरांची लॉटरी काढली होती. या योजनेतील ईडब्ल्यूएस घरांची किंमत 18 लाख तर एलआयजी घरांची किंमत 25 लाख ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सिडकोने आता 26 हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेत या किमती चारपटीने वाढवल्या आहेत. सिडकोने आज जाहीर केलेल्या किमतीनुसार तळोजा सेक्टर-25, खारघर बस डेपो-48, खारकोपर-38, कळंबोली बस डेपो 42, पनवेल बस टर्मिनस-45, खारघर बस टर्मिनस-48, मानसरोवर रेल्वे स्थानक-41, खांदेश्वर रेल्वे स्थानक-46, बामणडोंगरी-32, खारकोपर-40 लाख आणि वाशी ट्रक टर्मिनलमधील घराची किंमत 74 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही सर्व घरे 322 चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. खारघरमधील सेक्टर 1 ए मध्ये बांधण्यात आलेल्या 540 चौरस फूट घरांची किंमत तब्बल 97 लाख एवढी निश्चित करण्यात आली आहे.