
बोगस कर्मचारी घोटाळ्यापाठोपाठ सिडकोमध्ये आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचा घपला उघडकीस आला आहे. सिडकोच्या विविध विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पीएफ मनुष्यबळ पुरवणाऱ्या ठेकेदाराने सुमारे २० महिन्यांपासून भरलेला नाही. विशेष म्हणजे पीएफ भरल्याची पावती जमा केल्यानंतर सिडको प्रशासनाने पगाराची बिले काढणे आवश्यक होते. कार्मिक विभागाने कोणतीही शहानिशा न करता पगाराची बिले काढली आहेत.
पुणे येथील विशाल एक्सपर्ट सर्व्हिस या कंपनीला सिडकोमध्ये ठेकेदारी पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे. हा ठेका फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. सिडकोच्या विविध विभागात या कंपनीच्या माध्यमातून सुमारे ३५० कर्मचारी लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई या पदावर काम करीत आहेत. अत्यंत तोकड्या मासिक वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा पीएफ कंपनीने गेल्या २० महिन्यांपासून भरलेला नाही. सुरुवातीला याबाबत कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
पीएफ कार्यालयाने पाठवली नोटीस
सिडकोमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ३५० कर्मचाऱ्यांचा सुमारे २ कोटी रुपयांचा पीएफ विशाल एक्सपर्ट सर्व्हिस या ठेकेदार कंपनीने थकवल्यामुळे पीएफ कार्यालयाने सिडकोला नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांच्या थकवलेल्या पीएफचा तातडीने भरणा करण्यात यावा, असे निर्देश संबंधित ठेकेदार आणि सिडको प्रशासनाला दिले आहेत.