मित्राच्या दिशेने फेकलेला रेनकोट ओव्हरहेड वायरवर अडकला, लोकलचा खोळंबा; तरुणाला दोन हजारांचा दंड

मित्राच्या दिशेने तरुणाने फेकलेला रेनकोट ओव्हरहेड वायरवर अडकला. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा काही काळ खोळंबा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चर्चगेट स्थानकात घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सोमवारी दुपारी सुमित भाग्यवंत नावाचा 19 वर्षीय तरुण चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभा होता. तसेच त्याचा एक मित्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभा होता. सुमितला त्याच्याकडे असेलेले रेनकोट प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर असलेल्या मित्राला द्यायचा होता. त्यासाठी त्याने प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरूनच रेनकोट मित्राकडे फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र हा रेनकोट थेट रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर जाऊन पडला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मोठी कसरत करत रेनकोट काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.