चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या जगन्नाथ शंकरशेट वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अखेर युवासेनेमुळे न्याय मिळाला आहे. वसतिगृहातील गटारे तुंबल्याने असह्य दुर्गंधीने विद्यार्थी आजारी पडत होते. युवा सेनेने विद्यापीठ प्रशासनाला त्या मुद्यांवरून धारेवर धरल्यानंतर आजपासून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
वसतिगृहातील विद्यार्थ्यानी तुंबलेली गटारे आणि बिघडणाऱ्या आरोग्यासंदर्भात वसतिगृह प्रमुखांकडे तक्रारी दिल्या होत्या. त्याची दखल घेतली न गेल्याने विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागितली होती. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर कुलगुरू आणि कुलसचिवांनी जगन्नाथ शंकरशेट वसतिगृहाच्या स्वच्छतेबरोबरच नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम तातडीने सुरू केले. त्याबद्दल युवासेनेने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहेत.