Chinmay Deore- याने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला खेचले न्यायालयात, हद्दपारीविरोधात उठवला आवाज! वाचा सविस्तर

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात शिकणाऱ्या हिंदुस्थानी चिन्मय देवरे याने ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे. वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 21 वर्षीय पदवीधर विद्यार्थी चिन्मय ऑगस्ट 2021 पासून, संगणक शास्त्राचा अभ्यास करत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात, अमेरिकेतील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हद्दपारीचा धोका निर्माण झालेला आहे. अनेकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे आणि अजून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

हिंदुस्थानातील विद्यार्थी चिन्मय देवरे याने चीन आणि नेपाळमधील इतर तीन विद्यार्थ्यांसह अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांचा विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा बेकायदेशीरपणे रद्द केल्यामुळे खटला दाखल केला आहे. चिन्मय देवरे व्यतिरिक्त चीनमधील जियांग्युन बु आणि किउयी यांग तसेच नेपाळमधील योगेश जोशी यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला होता की, स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टम (SEVIS) मधील त्यांचे विद्यार्थी इमिग्रेशन स्टेटस पुरेशी सूचना आणि स्पष्टीकरण न देता बेकायदेशीरपणे संपुष्टात केले गेले आहे.

मिशिगनमधील अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (एसीएलयू) ने या विद्यार्थ्यांच्या वतीने खटला दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, चिन्मय देवरे पहिल्यांदा 2004 मध्ये त्याच्या कुटुंबासह H-4 व्हिसावर अमेरिकेला गेला होता. 2008 मध्ये तो आणि त्याचे कुटुंब अमेरिका सोडून गेले. नंतर 2014 मध्ये चिन्मय त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत परतला. मिशिगनमधील हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर, त्याने H-4 दर्जासह वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले.

 

वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 21 वर्षीय पदवीधर विद्यार्थी चिन्मय ऑगस्ट 2021 पासून तिथे संगणक शास्त्राचा अभ्यास करत आहे. मे 2022 मध्ये, देवरेचा एच-4 व्हिसा संपत होता. त्यानंतर त्याने कायदेशीररित्या त्याचा व्हिसाचे F-1 विद्यार्थी दर्जामध्ये रूपांतर करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केला आणि त्याला परवानगी देण्यात आली. येत्या मे 2025 मध्ये त्याचे पदवीधर शिक्षण पूर्ण होणार आहे.

खटल्यानुसार, देवरेवर अमेरिकेत कधीही कोणत्याही गुन्ह्याचा आरोप लावण्यात आलेला नाही किंवा त्याला दोषी ठरवण्यात आलेले नाही. पार्किंग दंड वगळता त्याच्यावर कोणत्याही नागरी उल्लंघनाचा, मोटार वाहन कोडचा किंवा इमिग्रेशन कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप लावण्यात आलेला नाही. तो कोणत्याही राजकीय मुद्द्यांवर कॅम्पसमधील निषेधांमध्ये सक्रिय नव्हता.

4 एप्रिल रोजी, वेन स्टेट युनिव्हर्सिटीने चिन्मय देवरे यांना कळवले की त्यांचा SEVIS मधील F-1 विद्यार्थी दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्याला मिळालेल्या ईमेलमध्ये असे म्हटले होते की, “आमच्या नोंदींवरून असे दिसून येते की तुमचा SEVIS आज सकाळी संपुष्टात आला आहे. SEVIS रेकॉर्ड संपुष्टात आला आहे.” या व्यतिरिक्त, इतर कोणतेही तपशील किंवा आरोप दिले गेले नाहीत.