मोदी सरकार सुस्त… अरुणाचलमध्ये पुन्हा घुसखोरी! चिनी सैन्य 60 किमी आत घुसले!!

चीनच्या मुजोरीला रोखू न शकणाऱया केंद्रातील कचखाऊ सरकारमुळे चिनी सैन्याने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशातील कपापू भागात घुसखोरी केली आहे. अरुणाचलवर दावा सांगणाऱया चीनचे सैन्य आठवडाभरापूर्वीच या भागात हिंदुस्थानी हद्दीत 60 किलोमीटर आतवर घुसले होते. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनचा साधा निषेध करण्याचीही हिंमत दाखवलेली नाही.

अरुणाचल प्रदेशात हिंदुस्थान आणि चीनची सामायिक सीमारेषा आहे. चीनने आजवर अनेकदा या हद्दीतून हिंदुस्थानच्या भूभागात घुसखोरी केली आहे. गेल्या आठवडय़ात अंजाव जिल्ह्यातील कापापू भागात चीनने घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. सीमेपासून हा भाग 60 किलोमीटर आत आहे. चिनी सैन्याने तिथे शेकोटय़ा पेटवल्या. तेथील खडकांवर चिनी भाषेतील शब्द आणि चिनी खाद्यपदार्थांची चित्रे स्प्रे पेंट केली. याच खडकांवर चिनी सैनिकांनी 2024 असे इंग्रजी आकडय़ांत रंगवले आहे. हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केल्यावर तेथील भूभागावर दावा करण्यासाठी चिनी सैन्य अनेकदा हा प्रकार करत आले आहे. दोन्ही देशांमधील मॅकमोहन सीमारेषेवर हादिग्रा खिंड भागात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाची शेवटची छावणी कपापू येथे आहे. याच भागातील हादिग्रा लेकजवळ चिनी सैनिकांनी मोठी यंत्रसामग्री आणून काहीतरी काम केल्याचा एक व्हिडीओ ऑगस्ट 2022 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हिंदुस्थानी हद्दीत चीनने वसवले गाव

चीनने हिंदुस्थानी हद्दीत अरुणाचल प्रदेशमध्ये शियोमी जिल्ह्यात 60 इमारतींचे एक संपूर्ण गावच उभे केल्याचे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. उभय देशांतील एकूण 3488 किलोमीटर सीमेपैकी 1126 किलोमीटर सीमारेषा अरुणाचल प्रदेशात चीनला लागून आहे.

– मार्च 2019 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत हे गाव उभारल्यानंतर चीनने सीमेवर, सीमेजवळ आणि हिंदुस्थानच्या हद्दीत अनेक गावे वसवली आहेत.
लाल माकडांचे कारनामे
– ऑक्टोबर 2018 दरम्यान चिनी सैनिकांनी दिबांग खोऱयातील मथू आणि एमरा नद्यांच्या काठाजवळ सुमारे 14 किलोमीटर आत हिंदुस्थानी हद्दीत प्रवेश केला होता.
– 2019 मध्ये अमाको कॅम्प येथे हिंदुस्थानी हद्दीत 49 किलोमीटर आत येऊन डोइम्रू नाल्यावर चिनी सैनिकांनी एक लाकडी पूल बांधला.
– चिनी सैन्याने 2020 मध्ये दिबांग व्हॅली जिल्ह्यात घुसखोरी केली होती. त्यावेळी एका पोर्टरने त्यांची छायाचित्रेही काढली होती.