
शुक्रवारी चीनने युरोपियन युनियनला अमेरिकेच्या एकतर्फी दादागिरी विरोधात (टॅरिफ) एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा टॅरिफ 145 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यानंतर आता चीनने युरोपियन युनियनला हे आवाहन केलं आहे. जर अमेरिका असेच पावले उचलत राहिला तर, तेही व्यापार युद्धासाठी पूर्णपणे तयार असल्याचे चीनने आधीच स्पष्ट केलं आहे.
बीजिंगमध्ये स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हे आवाहन केले आहे. चिनी सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, शी जिनपिंग यांनी युरोपियन युनियनला आवाहन केलं आहे की, त्यांनी अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापार वादाचा सामना करण्यासाठी चीनसोबत एकत्र काम करावं.
शी जिनपिंग म्हणाले, “चीन आणि युरोपने संयुक्तपणे त्यांच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि अमेरिकेच्या एकतर्फी धमकी देणाऱ्या धोरणांना संयुक्तपणे विरोध केला पाहिजे.”