
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांचा टॅरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केला आहे. तसेच चीनचा टॅरिफ आता 145 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. चीननेही अमेरिकेशी पंगा घेण्याचे निश्चत केले असून संभाव्य आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अमेरिकेविरोधात मोर्चेबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाकडे पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आल्याने अमिरिकेविरोधातील टॅरिफ वॉरमध्ये चीन एकटा पडल्याचे दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने लादलेल्या टॅरिफविरुद्ध एकत्र येत युती स्थापन करण्याचा चीनचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने नाकारला आहे. त्यामुळे आता तीव्र झालेल्या व्यापार युद्धात चीनची भूमिका काय असणार याची यावर चर्चा होत आहे. मात्र, अमेरिकेच्या शुल्काविरुद्ध युती स्थापन करण्याचा चीनचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने नाकारला आहे. ऑस्ट्रेलियातील चीनचे राजदूत जिओ कियान यांनी ऑस्ट्रेलियाला असा प्रस्ताव दिला होता की, एकत्रपणे अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा प्रतिकार करणे त्यांच्या वर्चस्ववादी आणि गुंडगिरीच्या वर्तनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येत अमेरिकेच्या वर्चस्ववादाला विरोध करणे गरजेची असल्याची भूमिका चीनने मांडली आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याबाबत सांगितले की, आपला देश राष्ट्रीय हितांना प्राधान्य देईल आणि आम्ही चीनच्या भूमिकेशी सहमत नाही. ऑस्ट्रेलिया चीनसोबत हातमिळवणी करणार नाही. त्याऐवजी त्यांच्या व्यापार संबंधांमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित करेल. आम्ही चीनसोबत कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. सद्यस्थितीत जगाला व्यापार युद्ध परवडणारे नाही. मात्र, आमचे राष्ट्रीय हित लक्षात घेता व्यापारात विविधता आणण्यावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलिया व्हाईट हाऊसशी पुढील वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच ऑस्ट्रेलिया अमेरिकेबाहेर पर्यायी निर्यात संधींचा शोध घेत आहे. इतर देशांसोबत व्यापारात विविधता आणून चीनवरील अवलंबित्व कमी करणे आणि आर्थिक लवचिकता वाढवणे हे देशाचे उद्दिष्ट आहे. 80 टक्के व्यापारात अमेरिकेचा समावेश नाही. ऑस्ट्रेलियासाठी संधी आहेत आणि आम्ही त्या मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ऑस्ट्रेलियाच्या या भूमिकेमुळे व्यापार युद्धात चीन एकाकी पडल्याचे दिसत आहे.