देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानमग्न झाले असताना सीमेवर चीनच्या कुरापती वाढू लागल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशजवळ सीमेवर 624 गावे वसवल्याची माहिती बुधवारी उघड झाली होती. त्यानंतर आता सिक्कीम सीमेपासून अवघ्या 150 किलोमीटरवर चीनने अत्याधुनिक स्टील्थ फायटर जेट जे-20 तैनात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑल सोर्स अॅनालिसीसच्या सॅटेलाईट इमेजमध्ये हे लढाऊ विमान दिसून आले आहे. चीनने तिबेटमधील शिगात्सो शहरातील सैन्य आणि नागरी उड्डाण अशा दुहेरी हेतूने वापरात येणाऱया फ्लाईट लाईनवर वायुसेनेची सहा विमाने उभी केली आहेत. सॅटेलाईट इमेजवरून हे दिसून आलंय. शिगात्से विमानतळ 12 हजार 408 फूट उंचीवर आहे. जगातील सर्वात उंचीवर असलेल्या विमानतळांमध्ये याची गणना होते. चीनने जेट फायटरसोबत एक केजे- 500 एअरबोर्न अर्ली वार्ंनग अँड पंट्रोल एअरक्राफ्ट तैनात केले आहे.
जे-20 स्टील्थ फायटर चीनचे सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ही विमाने चीनच्या पूर्व प्रांतात उभी असल्याचे सॅटेलाईट इमेजवरून दिसतंय. तिबेटच्या शिगात्सो शहरातील उड्डाणांच्या नेहमीच्या जागेबाहेर, पण हिंदुस्थानच्या सीमेजवळ ती तैनात आहेत.
चीनने ही काही पहिल्यांदा केलेली कुरापत नाही. याआधी 2020 ते 2023 दरम्यान चीनच्या होटन प्रांतात झिंजियांग येथे जेट विमाने दिसली होती. मात्र जे-20 फायटर तैनात करणे हे चिंता वाढवणारे आहे. खरंतर चीनने 250हून अधिक स्टील्थ फायटर तैनात केले आहेत, पण ती सगळी रडारवरून दिसणे कठीण आहे. स्टेल्थ लढाऊ विमाने वापरणारा चीन हा तिसरा देश आहे.
मागील तीन वर्षांमध्ये चीनने तिबेट आणि हिंदुस्थानच्या जवळील प्रांतात आपली वायुक्षमता वाढवली आहे. नवीन विमानतळाची निर्मिती करणे, तर जुन्या विमानतळांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे अशा स्वरूपात चीनचे काम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात जे-20 आणि एच-6 अणुबॉम्ब सक्षम बॉम्बवर्षकसारखी विमाने तैनात करायला सुरुवात केल्याचेही समजते.