बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास चीनचा नकार, अमेरिकेच्या टॅरिफला जशास तसे प्रत्युत्तर

चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या 145 टक्के टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने हा आदेश जारी केल्याची चर्चा आहे.

अनेक देशांच्या विमान कंपन्या बोइंगने बनवलेली विमाने वापरतात. बोइंग ही अमेरिकेची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे आणि ती जगातील तिसरी सर्वात मोठी संरक्षण करार करणारी कंपनीदेखील आहे. ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफ निर्णयाला जशास तसे उत्तर देताना चीनने आता जगविख्यात बोइंग एअरप्लेन्स या अमेरिकन कंपनीवर अप्रत्यक्षरीत्या बंदी घातली आहे. चीनने अमेरिकेत बनवलेल्या विमानांचे भाग आणि उपकरणांची खरेदी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

चीनने मौल्यवान धातूंचा पुरवठाही थांबवला

अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापार युद्धादरम्यान चीनने 7 मौल्यवान धातूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. समेरियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिसप्रोसियम, ल्यूटेटियम, स्पँडियम, यिट्रीयम अशी या रेअर अर्थ मटेरियलची नावे आहेत. चीनने कार, ड्रोनपासून ते रोबोट आणि क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व काही एकत्र करण्यासाठी आवश्यक  चुंबकांची निर्यात रोखली आहे. ऑटोमोबाईल, सेमीपंडक्टर आणि एरोस्पेस व्यवसायांसाठी हे साहित्य अत्यंत महत्त्वाचे आहे.