चीनमधील व्हायरसचा धसका, महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क; राज्यात सर्दी – खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू

चीनमध्ये कोरोनासदृश ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसने (एचपीएमव्ही) उच्छाद मांडला आहे. लाखो नागरिकांना त्या विषाणूची लागण झाली असून रोज शेकडोंचा मृत्यू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अॅलर्ट झाला आहे. घाबरू नका, पण सावध रहा अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यातील नागरिकांना केल्या असून सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही अधिकाऱयांना दिले आहेत.

राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. एचपीएमव्ही हा एक तीव्र स्वरूपाचा श्वसन संसर्ग आहे. महाराष्ट्रात एचपीएमव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे सांगतानाच, आरोग्य संचालकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती दिली आहे.

हे करा

ताप आल्यास, खोकला किंवा शिंक येत असल्यास तोंडावर रुमाल धरा, साबण किंवा सॅनिटायझरने हात वेळोवेळी धुवा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा, भरपूर पाणी प्या आणि पौष्टीक अन्न खा, घरे-कार्यालयांत व्हेंटीलेशनची काळजी आवर्जून घ्या.

हे करू नका

हस्तांदोलन, टिश्यूपेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक, तोंडाला वारंवार स्पर्श, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे.

मलेशियातही मेटान्यूमोव्हायरसचा उद्रेक

चीननंतर मेटान्यूमोवायरसचा मलेशियातही उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. मलेशियात या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आता खऱया अर्थाने जगाचे टेन्शन वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णांची संख्या मलेशियात वाढत असल्याचे समोर आले आहे. या नव्या विषाणुमुळे मलेशियात भीतीचे वातावरण आहे. नागरिक स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच शक्य त्या ठिकाणी मास्कचा वापर करत आहेत. शिंकताना किंवा खोकताना काळजी घेत आहेत. नागरिकांना हात वारंवार साबणाने धुण्याचे आणि कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.