कुरघोड्या चीनने चंद्राच्या पृष्ठभागावरून आणली माती, काळ्याकुट्ट अंधारातून घेतले नमुने

चंद्रावरुन माती आणण्यास अखेर चीनच्या चंद्रमोहिमेला यश आले आहे. चंद्राच्या गडद भागातून पृथ्वीवर माती आणणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. सुमारे 55 दिवसांनी चिनी नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचे चांगई-6 लँडर कॅप्सूलमध्ये मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर परतले आहे. वर्ष 2030 मध्ये चंद्रावर मानवाला पाठवण्याचे लक्ष्य चीनने ठेवले असून, हे मिशन याच लक्ष्याचा भाग आहे. चीनने 3 मे रोजी चांगई-6 मिशन लाँच केले. चंद्रावरील दूरवरच्या अंधार असणाऱ्या भागात जाऊन मातीचे नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणणे हे या मिशनचे लक्ष्य होते.

आतापर्यंत चंद्रावर 10 चांद्रमोहिमा यशस्वीपणे पार पडल्या. मात्र या सर्व मोहिमा फक्त जवळच्या दृश्यमान भागात पोहोचल्या आहेत. यामध्ये भारत आणि अमेरिकेचाही समावेश आहे. चीनने ही मोहिम यशस्वी पार पाडत हे नमुने आणून स्पेस रेसमध्ये अमेरिकेला एक प्रकारे खडतर आव्हान दिले आहे. चीनचे चांगई-6 मिशन चंद्रावरून 2 किलो माती घेऊन आले आहे. अमेरिकेलाही चंद्राच्या याच भागात आपला बेस बनवायचा आहे.