पँगाँग सरोवरावर चीनच्या सैन्याने बांधला पूल, वाहतूकही केली सुरू, सॅटेलाईट फोटोंमुळे फुटले गुपित

 

चीनच्या सैन्याने पँगाँग सरोवरावर पूल बांधला आहे. इतकंच नाही तर या पुलावरून सैन्याने वाहतूकही सुरुवात केली आहे. सॅटेलाईटच्या फोटोंमुळे ही बाब समोर आली आहे. या पुलामुळे चीन सैन्याला 50 ते 100 किमीचा प्रवास वाचणार आहे.

1958 साली चीनने भारताच्या हद्दीतला काही भाग बळकावला होता. याच भागावर चीनने हा पूल बांधला आहे. हा भाग भारत चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आहे. या पुलाच्या माध्यमातून चीनच्या सैनिकांना पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागात जाणे सोपे होणार आहे. हा भाग जरी चीनने बळकावला असला तरी भारताने या जागेवरचा आपला हक्क सोडलेला नाही.


डेमिन सायमन यांनी हे सॅटेलाईट फोटो काढले आहेत. सायमन म्हणाले की नव्या पुलामुळे चीनच्या सैनिकांना या भागात प्रवास करणे आणखी सोपे होणार आहे. पूर्वी चीनच्या सैन्याला या भागात पोहोचण्यासाठी पूर्वेकडून फिरून यावे लागत होते. सीमाभागात जर काही अडचण आली तर सैनिकांना इथे पोहोचायला वेळ लागत होता. पण आता पुलामुळे चीनच्या सैनिकांचा वैळ वाचणार आहे.

पँगाँग सरोवरावरील पुलामुळे चीनच्या सैनिकांचा 50 ते 100 किमीचा आणि काही तासांचा प्रवास कमी होणार आहे. चीनने हा पूल अवैधरित्या बळकावलेल्या जागेवर बांधला आहे अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र खात्याने दिली आहे. तसेच चीनने केलेल्या या भागावरचा दावा भारताने कधीच मान्य केला नसल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

चीनने नवीन बांधलेला पूल हा सरोवराच्या उत्तर भागाला जोडलेला आहे. या भागात आधीच चीनने रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हा रस्ता खुर्नाक किल्ल्याच्या मार्गाने जातो. खुर्नाक किल्ला हा तिबेटियन किल्ला असून 1958 साली चीनने बेकायदेशीररित्या बळकावलेला आहे.