मातृभाषेतूनच मुले चांगली शिकतात! युनेस्कोचा अहवाल

मुलांच्या घरी जी भाषा बोलली जाते, त्याच भाषेतून जर त्यांना शिक्षण मिळाले तर ती मुले चांगली शिकू शकतात. तसेच दुसऱ्या भाषेत जर त्यांना शिकवले गेले तर त्यांना न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या क्षमतेत तफावतसुद्धा निर्माण होऊ शकते, असे निष्कर्ष युनेस्कोने जाहीर केलेल्या एका अहवालातून समोर आले आहेत.

युनेस्कोने ‘भाषा बाब – बहुभाषिक शिक्षणावरील जागतिक मार्गदर्शन’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यात हा दावा करण्यात आला आहे. जगभरातील 40 टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेत वाचनाची सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक मुलांना साधे-साधे वाक्य वाचता येत नाही. तसेच गणित अवघड जात असल्याचे दिसत आहे. यासोबतच 6 ते 8 वयोगटातील मातृभाषेत शिकणारी मुले अधिकृत भाषेत शिकणाऱ्या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करतात, असे दिसून आले. युनेस्कोने जागतिक भाषा ऍटलासनुसार, जगभरातील सरकारांनी 8,324 भाषांचे दस्तऐवजीकरण केले आहे. सध्या यापैकी 7,000 भाषा वापरात आहेत, असे निदर्शनास आले आहे.

गुजरातमध्ये बोलली जाणारी वागडी भाषा राजस्थानातील डुंगरपूर जिह्यात मोठय़ा प्रमाणात बोलली जाते. 2019 मध्ये येथील शिक्षकांनी मुलांना केवळ वागडी भाषेत शिकवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनंतर जेव्हा मुलांचे मूल्यांकन करण्यात आले, तेव्हा असे दिसून आले की त्यांचे वाचन कौशल्य आधीच्या तुलनेत सुधारले आहे. युरोप आणि आफ्रिकेतही असेच परिणाम दिसून आले. याशिवाय जर एखाद्या मुलाला त्याच्या मातृभाषेत मूलभूत शिक्षण दिले तर त्याला इतर भाषा शिकणे सोपे होते.

आपल्या मुलांना मातृभाषेत शिकवण्याऐकजी हल्लीच्या पालकांचा कल त्यांना इंग्रजी माध्यमांकडे टाकण्याचा जास्त असतो. ही परिस्थिती हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे.