कायदेशीर बंदी असूनही बालविवाह आजही सुरु असल्याच्या घटना वारंवार उघडकीला येत असतात. असाच एक प्रकार मुंबईपासून जवळच असणाऱ्या नवी मुंबईमध्ये घडला आहे. एका 29 वर्षीय पुरुषाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.
29 वर्षीय मनोजने (बदलेले नाव) 12 वर्षीय कोमलशी (बदलेले नाव) लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सातारा जिल्ह्यातील आहेत. गुरुवारी पनवेल येथील स्थानिक डॉक्टरकडे पीडिता तपासणीसाठी आली होती. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना धक्का बसला. पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यामुळे डॉक्टरांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली.
खांदेश्वर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात, भारतीय दंड संहिता (आयपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.